यशश्री अपडेट्स-प्रतिनिधी
कोळेगाव धरण परिसरात बेकायदेशीर मासेमारी करून हजारो रुपयांचे मासे चोरून नेल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला असून या प्रकरणाने मत्स्य व्यवसायिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या प्रकरणी सहा जणांसह इतरांविरुद्ध करमाळा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी महावीर विलास भोई (रा. आलेवर, ता. परांडा, जि. धाराशिव) यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या छत्रपती मत्स्य व्यवसाय संस्थेकडे २०२५ ते २०२९-३० पर्यंत कोळेगाव धरणातील मासेमारीचा वैध करार आहे. मात्र मागील काही दिवसांपासून संस्थेच्या सभासदांना अपेक्षेपेक्षा कमी मासे मिळत असल्याने संशय निर्माण झाला होता.
रात्रीचा डाव… धरणातून थेट मासे बाहेर!
संस्थेच्या वॉचमन व कामगारांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्यानंतर १८ मेच्या रात्री ते १९ मेच्या पहाटेदरम्यान काही जणांनी धरण परिसरात गुप्तपणे मासेमारी केल्याचे समोर आले. आरोपींनी सुमारे ५०० किलो कोळंबी व कटला जातीचे मासे पकडून नदीकाठावर आणल्याचा आरोप करण्यात आला आहे.
कामगारांनी विरोध करताच आरोपींनी मासे घेऊन घटनास्थळावरून पलायन केल्याचे फिर्यादीत नमूद आहे. या चोरीमुळे संस्थेचे सुमारे ६० हजार रुपयांचे नुकसान झाल्याचा दावा करण्यात आला आहे.
धमक्या, शिवीगाळ आणि खोट्या तक्रारीचा आरोप
घटना उघड झाल्यानंतर काही महिलांनी संस्थेच्या वॉचमनला शिवीगाळ करत विनयभंगाची खोटी तक्रार दाखल करण्याची धमकी दिल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
या प्रकरणी पिंटू रामसिंग सल्ले, तानाजी विक्रम नगरे, पदमसिंह शिंदे, राजेंद्र दयराम सल्ले, बालाजी मच्छिंद्र नगरे, मच्छिंद नगरे व इतरांविरुद्ध भारतीय न्याय संहिता २०२३ अंतर्गत कलम ३०३(२), ३५१(२), ३५२ व ३(५) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मत्स्य व्यवसायिकांचा इशारा
“अधिकृत परवानाधारकांचे नुकसान करून बेकायदेशीर मासेमारी सुरू राहिली तर कठोर आंदोलन करू,” असा इशारा मत्स्य व्यवसायिकांकडून देण्यात येत असून प्रशासनाने धरण परिसरात कडक बंदोबस्त व नियमित तपासणीची मागणी जोर धरत आहे.
आता प्रश्न एकच — कोळेगाव धरणातील मासे चोरीचे रॅकेट थांबणार की आणखी मोठे मासे बाहेर येणार?

