यशश्री अपडेट्स -परंडा (प्रतिनिधी) जिल्हा प्रशासनाच्या वतीने १९ जुलै २०२५रोजी तब्बल १५ लाख २७ हजार ८८१ वृक्षांची लागवड करून जागतिक विक्रम नोंदवण्यात आला होता. मात्र, वर्ष पूर्ण होण्याआधीच या विक्रमाच्या यशावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, देखभाल व पाणी आसून ही पाणी नियोजनाच्या अभावामुळे मोठ्या प्रमाणात वृक्ष वाळल्याचे वास्तव समोर येत आहे.
परंडा तालुक्यातील सीना-परिसरात जलसंपदा विभागाच्या विविध शाखांनी सुमारे ६० हजार वृक्षांची लागवड केली होती. परंतु, सध्या त्यापैकी केवळ ३० ते ३५ टक्केच झाडे जिवंत असल्याची धक्कादायक बाब उघड झाली आहे. जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्या मार्गदर्शनाखाली ‘एक पेड माँ के नाम’ आणि ‘हरित धाराशिव’ या अभियानांतर्गत मोठ्या उत्साहात वृक्षलागवड मोहीम राबविण्यात आली होती.
या मोहिमेची वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड्ससह तीन एजन्सींनी दखल घेतली होती. प्रत्येक रोपाला क्यूआर कोड लावून आधुनिक तंत्रज्ञानाचाही वापर करण्यात आला होता. मात्र, या झाडांच्या संगोपना बाबत प्रशासनाची गंभीरता अपुरी पडल्याचे चित्र दिसून येत आहे. मार्च २०२६ मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत जलसंपदा विभागाने ६०.३६ टक्के वृक्ष जिवंत असल्याचा अहवाल सादर केला होता. मात्र, प्रत्यक्ष पाहणी केल्यास परिस्थिती अत्यंत चिंताजनक आहे. धरणाच्या अगदी २०० ते ३०० मीटर अंतरावर असूनही पाणी उपलब्ध न झाल्याने अनेक झाडे करपून गेली आहेत.
झाडाच्या संगोपनासाठी स्वतंत्र शासकीय निधी उपलब्ध नसल्याची माहिती संबंधित अभियंत्यांनी दिली आहे.
काही कर्मचाऱ्यांनी स्वतः वर्गणी गोळा करून तसेच पाईपलाईनद्वारे पाणीपुरवठा
करण्याचा प्रयत्न केला, तरीही कडक उन्हाळा आणि मुरमाड जमिनीमुळे अपेक्षित यश मिळाले नाही. दरम्यान, या प्रकारामुळे नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे. लाखो झाडे लावून फक्त कागदावर विक्रम करायचा आणि नंतर ती वाळू द्यायची, यात पर्यावरणाचा आणि जनतेच्या श्रमांचा काय फायदा? असा सवाल नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे. सीना-कोळेगाव प्रकल्पातील सद्यस्थिती लक्षात घेता, जिल्ह्यातील इतर भागात लावलेल्या लाखो वृक्षांचीही तातडीने सखोल तपासणी करावी, अशी मागणी आता जोर धरत आहे.
