यशश्री अपडेट्स (प्रतिनिधी)
किल्ला परिसरातील मुख्य रस्त्यावर झालेली अनधिकृत अतिक्रमणे परंडा नगरपरिषदेने आज कडक पोलीस बंदोबस्तात मोहीम राबवून हटवली. या धडक कारवाईमुळे गेल्या अनेक महिन्यांपासून कोंडीत अडकलेला किल्ल्याचा रस्ता अखेर मोकळा झाला आहे.ऐतिहासिक परंडा किल्ल्याला भेट देण्यासाठी राज्यभरातून मोठ्या संख्येने पर्यटक येत असतात. मात्र, किल्ल्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर अनेक हातगाडे, पानटपऱ्या आणि अनधिकृत विक्रेत्यांनी रस्ता व्यापला होता. या अतिक्रमणामुळे वाहतुकीची कोंडी होऊन पर्यटकांना चालणेही कठीण झाले होते. पर्यटकांच्या सुरक्षेचा आणि त्रासाचा विचार करून नगर परिषद प्रशासनाने हा मोठा निर्णय घेतला.आज सकाळी नगरपरिषदेच्या पथकाने पोलीस प्रशासनाच्या मदतीने थेट घटनास्थळी धाव घेत कारवाई सुरू केली. अचानक झालेल्या या कारवाईमुळे अतिक्रमणधारकांमध्ये एकच खळबळबळ उडाली. काही प्रमाणात वाद घालण्याचा प्रयत्न झाला, मात्र चोख पोलीस बंदोबस्तामुळे प्रशासनाने सर्व अतिक्रमणे हटवून रस्ता पूर्णपणे मोकळा केला. नगरपरिषदेच्या या धाडसी निर्णयाचे पर्यटक आणि स्थानिक नागरिकांमधून मोठे स्वागत होत आहे.
