लाल मातीतून घडलेले नेतृत्व; पै. विशाल (नाना) देवकर यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छांचा वर्षाव

यशश्री अपडेट्स | परंडा

शिवसेना नेते तथा आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांचे विश्वासू सहकारी, माजी युवासेना तालुकाप्रमुख आणि पैलवान विशाल (नाना) देवकर यांचा वाढदिवस रविवारी परंडा शहरासह तालुक्यात विविध ठिकाणी मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. मित्र, कार्यकर्ते, युवक आणि चाहत्यांनी दिवसभर केक कापून, पुष्पगुच्छ देऊन तसेच शाल-श्रीफळ अर्पण करत त्यांचे अभिष्टचिंतन केले. शहरातील विविध भागांत शुभेच्छांचे फलक झळकले, तर अनेक सामाजिक, राजकीय आणि विविध क्षेत्रातील मान्यवरांनी प्रत्यक्ष भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या.

कंडारी गावच्या मातीत वाढलेल्या विशाल (नाना) देवकर यांनी कुस्तीच्या मैदानातून आपल्या कर्तृत्वाची वेगळी ओळख निर्माण केली. जिद्द, मेहनत आणि चिकाटीच्या जोरावर त्यांनी राज्यातील अनेक प्रतिष्ठित कुस्ती स्पर्धांमध्ये उल्लेखनीय कामगिरी करत परंडा तालुक्याचे नाव उंचावले. त्यांच्या शिस्तबद्ध जीवनशैलीमुळे आणि खेळाडू वृत्तीमुळे युवकांमध्ये त्यांच्याविषयी विशेष आकर्षण निर्माण झाले.

कुस्तीतील यशानंतर त्यांच्या वाढत्या लोकप्रियतेची दखल तत्कालीन आमदार कै. ज्ञानेश्वर (तात्या) पाटील यांनी घेतली. युवकांमध्ये असलेला प्रभाव लक्षात घेऊन त्यांनी विशाल देवकर यांना राजकारणात संधी दिली. शिवसेनेकडून आनाळा जिल्हा परिषद गटातून उमेदवारी देत त्यांच्यावर विश्वास व्यक्त करण्यात आला. पहिल्याच निवडणुकीत त्यांनी समर्थपणे लढत दिली. अल्प फरकाने पराभव झाला असला तरी त्यांनी जनसंपर्क आणि सामाजिक कार्याचा ध्यास कायम ठेवला.

यानंतर त्यांनी युवकांना सोबत घेऊन रेती व्यवसायात प्रवेश केला. शासनाच्या नियमांचे पालन करत व्यवसाय उभारला आणि अनेक बेरोजगार युवकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून दिल्या. त्यामुळे अनेक कुटुंबांना आर्थिक आधार मिळाल्याचे त्यांच्या सहकाऱ्यांकडून सांगितले जाते. सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी रक्तदान शिबिरे, आरोग्य शिबिरे, धार्मिक कार्यक्रम, आपत्तीग्रस्तांना मदत आणि विविध समाजोपयोगी उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवला आहे.

शिवसेनेच्या संघटनात्मक कामातही विशाल (नाना) देवकर यांचे योगदान महत्त्वाचे मानले जाते. आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांचे विश्वासू सहकारी म्हणून त्यांनी अनेक राजकीय आणि सामाजिक उपक्रम यशस्वीपणे राबविले. जिल्हाप्रमुख दत्ता साळुंके, पैलवान नवनाथ जगताप यांच्यासह पक्षसंघटना मजबूत करण्यासाठी त्यांनी सातत्याने प्रयत्न केले असून, युवकांना पक्षाशी जोडण्याचे काम प्रभावीपणे केले आहे.

वाढदिवसानिमित्त शहरातील विविध ठिकाणी आयोजित कार्यक्रमांमध्ये मोठ्या संख्येने युवक, पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते. प्रत्येक ठिकाणी उत्साहपूर्ण वातावरण पाहायला मिळाले. विशाल (नाना) देवकर यांनी सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारत उपस्थितांशी संवाद साधला आणि त्यांच्या प्रेमाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख दत्ता साळुंके, पैलवान नवनाथ जगताप, युवा नेते माऊली गोडगे, शिवसेना मीडिया सेल प्रमुख सचिन सोनारीकर, रामा गोडगे, संदीप गाढवे, सोनू सौदागर, सतीश मिस्कीन, पैलवान शिवाजी काळे, मेघराज जगताप, समीर पठाण यांच्यासह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते, मित्रपरिवार आणि चाहत्यांनी विशाल (नाना) देवकर यांना शुभेच्छा देत त्यांच्या पुढील सामाजिक, राजकीय आणि वैयक्तिक वाटचालीसाठी सदिच्छा व्यक्त केल्या.

लोकसंपर्क, सामाजिक बांधिलकी आणि युवकांमधील वाढता प्रभाव लक्षात घेता आगामी काळात विशाल (नाना) देवकर यांचे नेतृत्व अधिक प्रभावीपणे पुढे येईल, असा विश्वास उपस्थितांनी यावेळी व्यक्त केला.

Leave a Reply

error: Content is protected !!