शिवशक्ती मैदानावर 14 वर्षीय मुलगा ठार; हृदयद्रावक घटना

यशश्री अपडेट्स-बार्शी (प्रतिनिधी): शहरातील शिवशक्ती मैदानावर आज शुक्रवारी सकाळी घडलेल्या एका दुर्दैवी अपघातात 14 वर्षीय मुलाचा मृत्यू झाल्याने संपूर्ण शहरात हळहळ व्यक्त केली जात आहे. वीरेन योगीराज चौधरी (वय 14, रा. सुभाष नगर, बार्शी) असे मृत मुलाचे नाव आहे. येथील शिवशक्ती मैदानावर दररोज सकाळी व संध्याकाळी शेकडो विद्यार्थी व्यायाम, धावणे तसेच विविध खेळांसाठी येत असतात. आज सकाळी सुमारे 7 वाजण्याच्या सुमारास मैदानाची देखभाल सुरू असताना ही हृदयद्रावक घटना घडली.

प्राथमिक माहितीनुसार, मैदान सपाट करण्यासाठी वापरण्यात येणारा दगडी रोलर मैदानावर चालविला जात होता. यावेळी खेळण्यासाठी आलेला वीरेन चौधरी हा रोलरच्या खाली आल्याने गंभीर जखमी झाला. अपघातानंतर उपस्थितांनी त्याला तातडीने डॉ. जगदाळे मामा रुग्णालयात दाखल केले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी उपचारापूर्वीच त्याला मृत घोषित केले. या घटनेमुळे बार्शी शहरात शोककळा पसरली असून नागरिकांकडून मैदानावरील सुरक्षा व्यवस्थेबाबत प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मैदानावर सुरक्षा रक्षकांची नियुक्ती आहे का, विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी आवश्यक उपाययोजना करण्यात आल्या होत्या का, तसेच मैदान व्यवस्थापन आणि संबंधितांची जबाबदारी काय, याबाबत चर्चा सुरू झाली आहे.

दरम्यान, या दुर्घटनेची माहिती मिळताच परिसरात नागरिकांची गर्दी झाली. अल्पवयीन मुलाच्या दुर्दैवी मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात असून संबंधित घटनेची सखोल चौकशी करण्याची मागणी होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *