बियाणे अनुदानासाठी त्वरित अर्ज करा; मुदतवाढ जाहीर

यशश्री अपडेट्स -परांडा (प्रतिनिधी )

परंडा तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून अनुदानित बियाणे मागणी अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत २७ मेपर्यंत वाढविण्यात आली आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांनी अद्याप अर्ज भरलेला नाही, त्यांना आणखी काही दिवसांची संधी उपलब्ध झाली आहे.
तालुक्यातील शेतकऱ्यांकडून वाढती मागणी लक्षात घेऊन शासनाने हा निर्णय घेतल्याचे सांगण्यात आले आहे. कृषी विभागाने दिलेल्या माहितीनुसार, खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर अनुदानित बियाणे वितरणासाठी आवश्यक प्रक्रिया सुरू असून पात्र शेतकऱ्यांनी वेळेत अर्ज करणे आवश्यक आहे.
परंडा तालुका कृषी अधिकारी नानासाहेब लांडगे यांनी शेतकऱ्यांना आवाहन करताना सांगितले की, अनेक शेतकरी अजून अर्ज प्रक्रियेपासून दूर आहेत. त्यामुळे वेळ न दवडता महाडीबीटी (Mahadbt) पोर्टलवर ऑनलाइन पद्धतीने अर्ज पूर्ण करावा.

राज्य शासनाकडून बियाणे वितरणासाठी निधी मंजूर करण्यात आला असून, अर्जांची छाननी झाल्यानंतर बियाणे किंवा मिनी किट वाटप प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता आहे. त्यामुळे जो शेतकरी लवकर अर्ज करेल, त्याला लाभ मिळण्याची संधी अधिक राहणार आहे.
कृषी विभागाने स्पष्ट केले आहे की, अंतिम मुदतीनंतर अर्ज स्वीकारले जाणार नाहीत. त्यामुळे पात्र असूनही अर्ज न करणारे शेतकरी अनुदानाच्या लाभापासून वंचित राहू शकतात.
कृषी अधिकाऱ्यांनी तालुक्यातील सर्व शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, “आजच अर्ज करा आणि अनुदानित बियाणे वितरणाच्या महत्त्वाच्या योजनेत सहभागी व्हा.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *