पत्नीच्या जीविताला धोका? ; पतीने उच्च न्यायालयात मागितले संरक्षण

यशश्री अपडेट्स-धाराशिव, दि. २४ : प्रेमविवाह केलेल्या पत्नीच्या सुरक्षिततेचा प्रश्न उपस्थित करत एका युवकाने मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठात धाव घेतली आहे. या प्रकरणात पोलिसांच्या भूमिकेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात आले असून, पत्नीच्या जीवितास धोका असल्याचा आरोप याचिकेत करण्यात आला आहे.

याचिकेनुसार, संबंधित युवक व युवती यांनी ४ मे २०२६ रोजी आळंदी येथे प्रेमविवाह केला. विवाहानंतर १० मे रोजी दोघेही संरक्षणासाठी येरमाळा पोलीस ठाण्यात गेले होते. मात्र, पोलिसांनी त्यांचे म्हणणे नोंदवून घेतले नाही तसेच संरक्षणही दिले नसल्याचा आरोप करण्यात आला आहे. पत्नीच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाल्याने पतीने अॅड. गणेश ज्योतीराम कोरे व अॅड. ओमप्रकाश वाघमारे यांच्यामार्फत उच्च न्यायालयात रिट याचिका दाखल केली आहे.

याचिकेत पुढे नमूद करण्यात आले आहे की, पोलीस ठाण्याबाहेर युवतीच्या नातेवाईकांची मोठी गर्दी जमली होती. त्यानंतर लातूर पोलिसांनी युवतीला जबरदस्तीने घेऊन गेल्याचा आरोप करण्यात आला आहे. सध्या युवती नातेवाईकांच्या ताब्यात असून तिच्या जीवाला धोका असल्याची भीती याचिकाकर्त्याने व्यक्त केली आहे.

या प्रकरणी क्रिमिनल रिट पिटिशन क्रमांक ६४८/२०२६ दाखल करण्यात आली आहे. न्यायमूर्ती वैशाली पाटील-जाधव यांनी १५ मे रोजी प्राथमिक सुनावणी घेत नोटीस बजावण्याचे आदेश दिले होते.

त्यानंतर २२ मे रोजी सुट्टीकालीन न्यायालयात न्यायमूर्ती सिद्धेश्वर एस. ठोंबरे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. यावेळी सरकारी पक्षाने युवतीचा जबाब न्यायालयात सादर केला. संबंधित युवतीने स्वतःच्या इच्छेने विवाह केल्याचे जबाबात नमूद असल्याची माहिती न्यायालयात देण्यात आली. मात्र, नोटीस मिळाल्यानंतरही युवतीला न्यायालयासमोर हजर करण्यात आले नसल्याचा मुद्दा याचिकाकर्त्यांच्या वतीने उपस्थित करण्यात आला.

दरम्यान, युवती सध्या स्वतःच्या इच्छेने नातेवाईकांसोबत राहत असल्याचे प्रतिवादींच्या वकिलांनी न्यायालयात सांगितले. मात्र, युवतीला घरात डांबून ठेवण्यात आल्याची भीती याचिकाकर्त्यांचे वकील अॅड. गणेश ज्योतीराम कोरे यांनी व्यक्त केली.

न्यायालयाने पुढील सुनावणी २९ मे २०२६ रोजी ठेवली असून, तोपर्यंत युवतीच्या सुरक्षिततेला बाधा पोहोचेल असे कोणतेही कृत्य करणार नाही, अशी हमी प्रतिवादींकडून नोंदवून घेतली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *