यशश्री अपडेट्स | धाराशिव
धाराशिव जिल्ह्यातील कृषी वर्तुळातून एक अत्यंत धक्कादायक आणि संतापजनक प्रकार समोर आला आहे. खरीप व रब्बी हंगाम २०२५-२६ मधील कोट्यवधी रुपयांच्या कृषी निविष्टा महाघोटाळ्यात प्रशासनाने अखेर आपली ‘पारंपारिक’ खेळी खेळली आहे. या संपूर्ण घोटाळ्याचे खापर एका कंत्राटी कर्मचाऱ्यावर फोडून, त्याला सेवेतून थेट बडतर्फ करण्यात आले आहे. मात्र, या घोटाळ्यात समसमान भागीदार असलेल्या तब्बल १६ बड्या शासकीय अधिकाऱ्यांना पद्धतशीरपणे अभय देण्यात आल्याचे चित्र निर्माण झाले असून, यामुळे शेतकरी आणि जनतेमधून तीव्र संताप व्यक्त होत आहे.
नेमका काय आहे महाघोटाळा?
राष्ट्रीय अन्न सुरक्षा आणि पोषण अभियान (NFSNM) अंतर्गत जिल्ह्यात एकात्मिक कीड व्यवस्थापन (IPM) आणि एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन (INM) कार्यक्रम राबवण्यात आला होता. या योजनेचा मूळ उद्देश गरजू शेतकऱ्यांना कृषी निविष्टांचा पुरवठा करून त्यांचे उत्पन्न वाढवणे हा होता.
परंतु, चौकशीत समोर आलेली माहिती अत्यंत थक्क करणारी आहे. कृषी विभागातील अधिकाऱ्यांनी संगनमत करून चक्क:
- भूमीहीन व्यक्तींना शेतकरी दाखवून लाभ दिला.
- मयत (मृत) व्यक्तींच्या नावे कागदोपत्री अनुदान लाटले.
- एकाच व्यक्तीला दुबार लाभ देऊन निधी लाटला.
- बिगर सभासद आणि अपात्र व्यक्तींच्या नावावर कोट्यवधी रुपयांचा वित्तीय अपहार केला.
आमदार कैलास पाटील यांच्या पाठपुराव्याला यश शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे आमदार कैलास पाटील यांनी या प्रकरणात सातत्याने तक्रारी करून वरिष्ठ पातळीवर पाठपुरावा केला होता. त्यांच्या याच आक्रमक भूमिकेमुळे या महाघोटाळ्याला वाचा फुटली आणि कृषी विभागाला चौकशी समिती नेमावी लागली.
१७ जण दोषी; गाज फक्त एका कंत्राटी कर्मचाऱ्यावर!
चौकशी समितीच्या अहवालानुसार, या गंभीर वित्तीय अपहार आणि प्रशासकीय गैरवर्तणुकीत एकूण १७ जणांना थेट जबाबदार धरण्यात आले आहे. यामध्ये २ जिल्हा कृषी अधीक्षक, ८ तालुका कृषी अधिकारी आणि ४ मंडळ कृषी अधिकाऱ्यांचा समावेश आहे.
परंतु, संचालक कृषी (विस्तार व प्रशिक्षण) यांच्या अभिप्रायाचा हवाला देत, विभागीय कृषी सहसंचालक महेशकुमार तीर्थकर यांनी केवळ जिल्हा सल्लागार (कंत्राटी कर्मचारी) सतीश सुरवसे यांच्यावर सेवा समाप्तीची (कायम बडतर्फ) कारवाई केली आहे. या कारवाईचे आदेश देऊन तीर्थकर यांनी अनुपालन अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहेत.
प्रश्न उपस्थित होत आहे की, कोट्यवधी रुपयांचा हा घोटाळा एकटा कंत्राटी कर्मचारी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या स्वाक्षरी आणि संमतीशिवाय कसा करू शकतो?
घोटाळ्यात सामील असलेले ‘ते’ १६ बडे अधिकारी कोण?
या महाघोटाळ्यात ज्या १६ अधिकाऱ्यांवर अद्याप कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, त्यांची नावे खालीलप्रमाणे आहेत:
१. जिल्हास्तरीय वरिष्ठ अधिकारी:
- पुरुषोत्तम वाघमारे (प्रभारी कृषी उपसंचालक)
- राजकुमार मोरे (जिल्हा कृषी अधीक्षक)
- महादेव असलकर (तत्कालीन प्रभारी कृषी अधीक्षक तथा उपविभागीय कृषी अधिकारी)
- राहुल दिवाणे (तंत्र अधिकारी, जिल्हा कार्यालय)
- राहुल सूर्यवंशी (सहायक कृषी अधिकारी)
२. तालुका कृषी अधिकारी (८ तालुके, ७ अधिकारी):
तालुकाअधिकारी यांचे नाव वाशीराजाराम बर्वे भूमअतुल ढवळे परंडानानासाहेब लांगडे कळंबभागवत सरडे धाराशिव व लोहारामहेश देवकते उमरगाज्ञानोबा रितापुरे तुळजापूरआबासाहेब देशमुख
३. मंडळ कृषी अधिकारी:
- काटकर (अणदूर मंडळ)
- नागटिळक (काटी मंडळ)
- एस. जी. देशमुख (नळदुर्ग मंडळ)
- भोसले (तुळजापूर मंडळ)
फक्त सेवा समाप्ती नको; गुन्हे दाखल करा!
कंत्राटी कर्मचारी सतीश सुरवसे यांची सेवा समाप्त करून प्रशासनाने स्वतःचे हात झटकण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र, जनतेमधून आणि शेतकरी संघटनांमधून आता आक्रमक मागणी होत आहे की, सुरवसे यांच्याप्रमाणेच या सर्व १६ अधिकाऱ्यांचे तात्काळ निलंबन करण्यात यावे.
केवळ विभागीय कारवाई करून चालणार नाही, तर या संपूर्ण घोटाळ्याप्रकरणी सर्वांवर थेट फौजदारी गुन्हे (FIR) नोंदवून, अपहार झालेली कोट्यवधी रुपयांची रक्कम या सर्वांच्या मालमत्तेतून वसूल करण्यात यावी, तरच धाराशिवच्या शेतकऱ्यांना खरा न्याय मिळेल. आता यावर शासन काय पाऊल उचलते, याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.
