मयत आईच्या व गंभीर आजारी वडिलांच्या नावावर बनावट सह्या; महाराष्ट्र ग्रामीण बँकेत ६ लाखांच्या कर्जाचा कथित अपहार, तिघांविरुद्ध गुन्हा

यशश्री अपडेट्स | नळदुर्ग

धाराशिव जिल्ह्यातील तुळजापूर तालुक्यातील नंदगाव येथे कौटुंबिक वाद आणि पैशांच्या लालसेतून अत्यंत धक्कादायक प्रकार समोर आला आहे. फिर्यादी आनंद माणिकराव चिनगुंडे यांच्या तक्रारीनुसार, त्यांच्या सख्ख्या भावांनी तत्कालीन बँक शाखा अधिकाऱ्याच्या संगनमताने मृत आई आणि गंभीर आजारी वडिलांच्या नावाचा गैरवापर करून महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या नळदुर्ग शाखेतून ६ लाख रुपयांचे कर्ज उचलल्याचा आरोप आहे. या प्रकरणी नळदुर्ग पोलीस ठाण्यात तिघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पोलिसांकडून पुढील तपास सुरू आहे.

फिर्यादीनुसार, ३१ मे २०२५ रोजी सकाळी साडेअकराच्या सुमारास महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या नळदुर्ग शाखेत हा कथित प्रकार घडला. त्यावेळी फिर्यादींचे वडील माणिकराव चिनगुंडे हे गंभीर आजारी होते, तर आई इंदुमती चिनगुंडे यांचे यापूर्वीच निधन झाले होते. असे असतानाही त्यांच्या नावावर बनावट सह्या करून कर्जाचा प्रस्ताव तयार करण्यात आल्याचा आरोप करण्यात आला आहे.

तक्रारीत नमूद केल्याप्रमाणे, आरोपींनी मृत आई आणि आजारी वडिलांच्या नावाने बनावट सह्या करून आवश्यक कागदपत्रे तयार केली. तसेच जामीनदाराच्या सह्याही बनावट करण्यात आल्याचा आरोप आहे. त्यानंतर तत्कालीन शाखा अधिकारी पंडित आसाराम जुकते यांनी आवश्यक पडताळणी न करता प्रस्ताव मंजूर केल्याचे फिर्यादीने म्हटले आहे. या कागदपत्रांच्या आधारे आरोपींनी ६ लाख रुपयांचे कर्ज उचलून त्याचे नूतनीकरण (Renewal) देखील करून घेतल्याचा आरोप आहे.

ही बाब लक्षात आल्यानंतर फिर्यादी आनंद चिनगुंडे यांनी नळदुर्ग पोलीस ठाण्यात धाव घेत तक्रार दाखल केली. त्यानुसार २७ जुलै २०२६ रोजी पोलिसांनी तात्काळ गुन्हा नोंदवून तपास सुरू केला.

या प्रकरणात हिरालाल माणिकराव चिनगुंडे, बसवंत माणिकराव चिनगुंडे (दोघेही रा. नंदगाव, ता. तुळजापूर) तसेच तत्कालीन शाखा अधिकारी पंडित आसाराम जुकते (महाराष्ट्र ग्रामीण बँक, नळदुर्ग) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) अंतर्गत कलम ३१८(४) (फसवणूक), ३३६(३) (बनावट दस्तऐवज तयार करणे), ३३९ (बनावट कागदपत्रे खरी म्हणून वापरणे), ३१६(५) (बँकरकडून विश्वासघात) आणि ३(५) (सामूहिक संगनमत) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

बँक अधिकाऱ्याच्या कथित सहभागामुळे आणि मृत व्यक्तीच्या नावाचा गैरवापर करून कर्ज मंजूर झाल्याच्या आरोपामुळे या प्रकरणाची तुळजापूर आणि नळदुर्ग परिसरात मोठी चर्चा सुरू झाली आहे. या प्रकरणात कागदपत्रांची सत्यता, बँकेची प्रक्रिया आणि संबंधितांची भूमिका याबाबत पोलीस सखोल तपास करत असून, तपासानंतर पुढील कारवाई होणार आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!