शिवसेनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त तुळजापूरात महाआरती व महाप्रसाद वितरण

यशश्री अपडेट्स : तुळजापूर (प्रतिनिधी)

तुळजापूर : शिवसेना पक्षाच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त तुळजापूर शहर व तालुका शिवसेनेच्या वतीने श्रीक्षेत्र तुळजापूर येथे आई तुळजाभवानी मातेची विधिवत महाआरती करण्यात आली. यावेळी राज्याच्या तसेच जनतेच्या सुख-समृद्धीसाठी प्रार्थना करण्यात आली. महाआरतीनंतर भाविकांना महाप्रसादाचे वाटप करून वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला.

यावेळी शिवसेना तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल जाधव यांनी आई तुळजाभवानी मातेच्या चरणी महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी साकडे घातले. तसेच राज्यातील जनतेच्या कल्याणासाठी कार्यरत असलेले शिवसेना नेते तथा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पुन्हा मुख्यमंत्रीपदाची संधी मिळावी, राज्याच्या विकासाचा वेग कायम राहावा आणि शेतकरी बांधवांचे चांगले दिवस पुन्हा यावेत, अशी प्रार्थना त्यांनी केली.

शिवसेनेच्या स्थापनेपासून पक्षाने मराठी माणूस, शेतकरी, कष्टकरी आणि सर्वसामान्यांच्या प्रश्नांसाठी सातत्याने संघर्ष केला असल्याचे यावेळी उपस्थित पदाधिकाऱ्यांनी सांगितले. पक्षाच्या ६० वर्षांच्या गौरवशाली वाटचालीचा उल्लेख करत शिवसैनिकांनी हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांप्रती निष्ठा व्यक्त केली.

या कार्यक्रमास तुळजापूर तालुकाप्रमुख अमोल जाधव, उपतालुकाप्रमुख विकास जाधव, शेतकरी सेनेचे तालुकाप्रमुख गणेश नेपते, शहरप्रमुख बापूसाहेब भोसले, शहर संघटक नितीन मस्के, संजय लोंढे, संभाजी नेपते यांच्यासह शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते व असंख्य शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाआरती आणि महाप्रसाद वितरणाच्या माध्यमातून शिवसेनेच्या वर्धापन दिनाला धार्मिक व सामाजिक स्वरूप प्राप्त झाले असून, तुळजापूरातील शिवसैनिकांनी मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम यशस्वी केला.

Leave a Reply

error: Content is protected !!