भाजपमधील वाद चव्हाट्यावर; अनिल काळेंचा थेट इशारा – ‘आम्ही कुणाचे गुलाम नाही!’

धाराशिव | यशश्री अपडेट्स

राज्याचे ग्रामविकास मंत्री तथा धाराशिव जिल्ह्याचे संपर्कमंत्री जयकुमार गोरे यांच्या सोमवारी (२८ जुलै) झालेल्या धाराशिव दौऱ्यात भाजपमधील अंतर्गत नाराजी आणि गटबाजी उघडपणे समोर आली. भाजपचे माजी प्रदेश कार्यकारिणी सदस्य ॲड. अनिल काळे यांनी मंत्री जयकुमार गोरे यांची भेट घेण्यापासून आपल्याला रोखण्यात आल्याचा आरोप करत मंत्र्यांसमोरच संताप व्यक्त केला. त्यानंतर त्यांनी आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्या कार्यपद्धतीवर गंभीर आरोप करत पक्षश्रेष्ठींकडे तक्रार करणार असल्याचे जाहीर केले.

‘आपला जीव धाराशिव व्हिजन-२०३०’ या कार्यक्रमासाठी मंत्री जयकुमार गोरे धाराशिव येथे आले होते. शासकीय विश्रामगृहात त्यांनी भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांच्या भेटी घेतल्या. यावेळी अनिल काळे यांनी मंत्र्यांची भेट घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी आपल्याला बाहेर थांबण्यास सांगून भेट घेण्यापासून अडविल्याचा आरोप काळे यांनी केला.

या घटनेनंतर काळे यांनी थेट मंत्र्यांचा ताफा अडवत आपली नाराजी व्यक्त केली. “मी गेली ३५ वर्षे भाजपसाठी एकनिष्ठपणे काम करत आहे. पक्षासाठी आयुष्य घालवल्यानंतर आज मंत्र्यांची भेट घेण्याचाही अधिकार आम्हाला राहिला नाही का? आम्हालाच का अडवले जात आहे?” असा सवाल त्यांनी मंत्री जयकुमार गोरे यांच्यासमोर उपस्थित केला.

या प्रकारामुळे काही काळ कार्यक्रमस्थळी तणावाचे वातावरण निर्माण झाले. उपस्थित कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ उडाला. मंत्री जयकुमार गोरे यांनी परिस्थिती शांत करण्याचा प्रयत्न केला. त्यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी यांनी हस्तक्षेप करून अनिल काळे यांची समजूत काढली. घडलेल्या प्रकाराबद्दल दिलगिरीही व्यक्त करण्यात आल्याची माहिती समोर आली.

घटनेनंतर माध्यमांशी बोलताना अनिल काळे यांनी आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांच्यावर जोरदार टीका केली. “कार्यकर्ते किरकोळ आहेत, त्यांचे योगदान काय, असा त्यांचा गैरसमज आहे. कार्यकर्त्यांना किंमत न देणे, चारचौघांत अपमान करणे आणि पदाधिकाऱ्यांना तुच्छ लेखणे ही त्यांची कार्यपद्धती झाली आहे. आम्ही कोणाचे गुलाम नाही. माझी पक्षातील ३५ वर्षांची तपस्या आहे. मी कोणाच्या मिंध्यात नाही, त्यामुळे मला घाबरण्याची गरज नाही,” असे ते म्हणाले.

काळे यांनी पुढे आरोप केला की, पक्षातील अनेक जुने कार्यकर्ते व पदाधिकारी नाराज असून त्यांना नेत्यांशी संपर्क साधू दिला जात नाही. “ही कार्यपद्धती राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये असताना सुरू होती, मात्र भाजपमध्ये ती चालणार नाही. आमदार पाटील हे पक्षाचे चालक किंवा मालक नाहीत. त्यांची कार्यशैली हुकूमशाहीची असून अनेक कार्यकर्ते अस्वस्थ आहेत,” असा आरोप त्यांनी केला.

याप्रकरणी प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, सुनील राणे तसेच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन संपूर्ण वस्तुस्थिती मांडणार असल्याचेही काळे यांनी सांगितले. “प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आणि सुनील राणे यांच्याशी फोनवर चर्चा झाली असून त्यांनी कार्यकर्त्यांच्या भावना समजून घेण्याचे आश्वासन दिले आहे,” असा दावा त्यांनी केला.

याशिवाय, जिल्ह्यातील काही वादग्रस्त प्रकरणांबाबतही पक्षश्रेष्ठींकडे माहिती देणार असल्याचे काळे म्हणाले. ड्रग्ज प्रकरणातील आरोपींना पाठीशी घालणे, कथितपणे कला केंद्रांना पाठबळ देणे, गुंड प्रवृत्तीच्या लोकांना राजाश्रय मिळत असल्याचा आरोप, तसेच कंत्राटी कामांबाबतही काही मुद्दे पक्ष नेतृत्वासमोर मांडणार असल्याचे त्यांनी सांगितले. या आरोपांबाबत संबंधितांकडून अधिकृत प्रतिक्रिया अद्याप समोर आलेली नाही.

दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून धाराशिव भाजपमधील अंतर्गत मतभेद पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. गेल्या काही महिन्यांपासून जुन्या पदाधिकाऱ्यांना दुय्यम वागणूक मिळत असल्याच्या, निर्णय प्रक्रियेत मोजक्याच नेत्यांचा प्रभाव वाढल्याच्या आणि निष्ठावान कार्यकर्त्यांकडे दुर्लक्ष होत असल्याच्या चर्चा सुरू होत्या. संपर्कमंत्र्यांच्या अधिकृत दौऱ्यातच ज्येष्ठ पदाधिकाऱ्याने सार्वजनिकरित्या नाराजी व्यक्त केल्याने या चर्चांना अधिक बळ मिळाले आहे.

या संपूर्ण घडामोडींमुळे धाराशिव जिल्ह्यातील भाजपच्या संघटनात्मक स्थितीबाबत पुन्हा प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, आगामी काळात या प्रकरणाचे राजकीय पडसाद उमटण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!