यशश्री अपडेट्स | तुळजापूर
तुळजापूर येथील जगदंबा श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानच्या प्रशासकीय कार्यालयातील जनसंपर्क अधिकारी (PRO) आणि सहाय्यक जनसंपर्क अधिकाऱ्याला दूरध्वनीवरून अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ करत मानसिक त्रास दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या प्रकरणी तुळजापूरचे नगराध्यक्ष विनोद गंगणे यांचे बंधू व नगरसेविका प्रियंका गंगणे यांचे पती विजय विलास गंगणे यांच्याविरोधात तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
नेमकी घटना काय?
श्री तुळजाभवानी मंदिर संस्थानमध्ये अभिजीत आनंतराव तेरखेडकर हे जनसंपर्क अधिकारी (PRO) म्हणून कार्यरत आहेत. सध्या मंदिर परिसरात पुरातत्त्व विभागाच्या वतीने जतन व संवर्धनाची कामे सुरू आहेत. या अंतर्गत डोली मार्गावरील गोमुख तीर्थाजवळील भिंतीचे पाडकाम सुरू असून, मार्गावर दगड पडत असल्याने भाविकांच्या सुरक्षेचा उपाय म्हणून प्रशासनाने वयोवृद्ध आणि दिव्यांग भाविकांसाठी उपलब्ध असलेली ‘डोली सेवा’ तात्पुरती बंद ठेवली होती.
दरम्यान, सुरज जगताप नावाचे पुजारी प्रशासकीय कार्यालयात आले आणि त्यांनी एका दिव्यांग भाविकासाठी डोलीची मागणी केली. त्यावेळी जनसंपर्क अधिकारी अभिजीत तेरखेडकर आणि सहाय्यक जनसंपर्क अधिकारी उमाकांत क्षीरसागर यांनी सुरक्षेच्या कारणास्तव काम सुरू असल्यामुळे डोली सेवा तात्पुरती बंद असल्याची कल्पना दिली.
फोनवरून शिवीगाळ आणि अरेरावी
पुजारी कार्यालयाबाहेर गेले आणि त्यांनी विजय विलास गंगणे यांना मोबाईलवरून संपर्क साधला. त्यानंतर हा फोन सहाय्यक जनसंपर्क अधिकारी उमाकांत क्षीरसागर यांच्या हातात देण्यात आला.
फोनवर बोलताना विजय गंगणे यांनी “डोली सेवा बंद का ठेवली?” अशी विचारणा करत उमाकांत क्षीरसागर आणि त्यानंतर जनसंपर्क अधिकारी अभिजीत तेरखेडकर या दोघांनाही अर्वाच्य आणि अत्यंत अश्लील भाषेत शिवीगाळ केली. शासकीय कामकाज सुरू असताना दूरध्वनीवरून अश्लील भाषा वापरून मानसिक त्रास दिल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे.
पोलीस ठाण्यात FIR दाखल
जनसंपर्क अधिकारी अभिजीत तेरखेडकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तुळजापूर पोलिसांत विजय विलास गंगणे (रा. तुळजापूर, जि. धाराशिव) यांच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) २०२३ च्या कलम २९६ आणि ३५१(४) अंतर्गत FIR क्र. ०३६४/२०२६ नोंदवण्यात आला आहे.
तपासाची सद्यस्थिती: या प्रकरणाचा पुढील तपास तुळजापूर पोलीस ठाण्याचे हेड कॉन्स्टेबल बालाजी कामटकर करत आहेत. मंदिर संस्थानच्या अधिकाऱ्याला झालेल्या शिवीगाळ प्रकरणामुळे तुळजापूर शहरात आणि भाविकांमध्ये मोठी खळबळ उडाली आहे.
