विद्यार्थ्यांच्या भविष्याशी खेळ थांबवा आणि विस्तार अधिकारी पदोन्नती रद्द करा; निर्णय न झाल्यास धाराशिव जिल्ह्यात तीव्र आंदोलनाचा काँग्रेसचा इशारा
यशश्री अपडेट्स | धाराशिव (विशेष प्रतिनिधी): महाराष्ट्रातील लाखो विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लावणाऱ्या MHT-CET परीक्षा प्रक्रियेतील कथित घोटाळा आणि धाराशिव जिल्हा परिषद शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी (शिक्षण) पदोन्नतीमधील गंभीर अनियमिततेच्या विरोधात धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीने आक्रमक भूमिका घेतली आहे. या दोन्ही प्रकरणांची राज्य व उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करावी, या प्रमुख मागण्यांसाठी काँग्रेसच्या वतीने मंगळवारी (दि. २८) धाराशिवचे जिल्हाधिकारी आणि जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) यांच्यामार्फत राज्याच्या संबंधित मंत्र्यांना सविस्तर निवेदने सादर करण्यात आली.
MHT-CET परीक्षेत पारदर्शकता आणा; उच्चस्तरीय चौकशीची मागणी
काँग्रेस कमिटीने दिलेल्या पहिल्या निवेदनानुसार, गेल्या तीन वर्षांपासून MHT-CET परीक्षा प्रक्रियेत सातत्याने गैरप्रकार आणि तांत्रिक गोंधळ होत असल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. यामुळे गुणवंत विद्यार्थ्यांवर मोठा अन्याय होत असून विद्यार्थी व पालकांमध्ये अत्यंत संभ्रमाचे आणि असंतोषाचे वातावरण निर्माण झाले आहे.
निवेदनातील मुख्य मागण्या:
- MHT-CET परीक्षा प्रक्रियेतील कथित घोटाळ्याची निष्पक्ष व उच्चस्तरीय (निवृत्त न्यायमूर्ती किंवा SIT द्वारे) चौकशी करण्यात यावी.
- या गैरप्रकारात सहभागी असलेल्या दोषींवर कठोर कायदेशीर व प्रशासकीय कारवाई व्हावी.
- परीक्षा पद्धती अधिक पारदर्शक, सुरक्षित आणि विश्वासार्ह करण्यासाठी तातडीने कडक नियमावली लागू करून विद्यार्थ्यांच्या हिताचे रक्षण करावे.
विस्तार अधिकारी (शिक्षण) पदोन्नती प्रक्रिया तात्काळ रद्द करा
दुसऱ्या निवेदनाद्वारे धाराशिव जिल्हा परिषदेच्या शिक्षण विभागात झालेला पदोन्नतीचा गोंधळ समोर आणण्यात आला आहे. ३ जुलै २०२६ रोजी राबवण्यात आलेल्या विस्तार अधिकारी (शिक्षण) पदोन्नती प्रक्रियेत शासन निर्णय, सेवाप्रवेश नियम आणि थेट सर्वोच्च व उच्च न्यायालयाच्या आदेशांचे उघडउघड उल्लंघन करण्यात आल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे.
निवेदनातील मुख्य मागण्या:
- ३ जुलै २०२६ रोजी पार पडलेली बेकायदेशीर पदोन्नती प्रक्रिया तातडीने पूर्णपणे रद्द करण्यात यावी.
- सर्व नियमांचे पालन करून नव्याने आणि पारदर्शक पद्धतीने पदोन्नती प्रक्रिया राबवली जावी.
- शासकीय नियमांची पायमल्ली करणाऱ्या संबंधित जबाबदार अधिकारी व कर्मचाऱ्यांवर शिस्तभंगाची व कायदेशीर कारवाई करण्यात यावी.
योग्य निर्णय न झाल्यास तीव्र जनआंदोलनाचा इशारा
विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भवितव्य आणि प्रशासनातील पारदर्शकता या दोन्ही अत्यंत संवेदनशील विषयांवर शासनाने तातडीने सकारात्मक पावले उचलावीत. जर शासनाने व प्रशासनाने या मागण्यांकडे दुर्लक्ष केले, तर धाराशिव जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीने संपूर्ण जिल्ह्यात लोकशाही आणि सनदशीर मार्गाने तीव्र जनआंदोलन छेडले जाईल, असा स्पष्ट इशारा यावेळी देण्यात आला.
संबंधित मंत्र्यांना पाठवली निवेदने
ही दोन्ही निवेदने जिल्हाधिकारी धाराशिव आणि मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यामार्फत उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, ग्रामविकास व पंचायत राज मंत्री जयकुमार गोरे आणि धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांना तात्काळ कारवाईसाठी पाठवण्यात आली आहेत.
यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष उमेश राजे निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली राजाभाऊ शेरखाने, प्रशांत पाटील, खलील सय्यद, विनोद वीर, अग्निवेश शिंदे, सरफराज काजी, संजय गजधने, बाबा मोमीन यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकारी, कार्यकर्ते आणि शैक्षणिक क्षेत्रातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
