‘आमदार तानाजी सावंत यांना डावलणे हेच तुमचं व्हिजन आहे का?’ – जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांना सावंत समर्थकांचा सवाल; ‘आपला जीव धाराशिव-व्हिजन 2030’ कार्यक्रमावर बहिष्कार

यशश्री अपडेट्स | धाराशिव

धाराशिव जिल्हा परिषदेच्या नव्या पदाधिकाऱ्यांच्या कार्यकाळातील पहिल्याच मोठ्या कार्यक्रमात महायुतीतील अंतर्गत मतभेद उघडपणे समोर आल्याचे चित्र दिसून आले. जिल्हा परिषदेच्या वतीने आयोजित ‘आपला जीव धाराशिव – व्हिजन 2030’ या महत्त्वाकांक्षी कार्यक्रमातील अधिकृत होर्डिंग, निमंत्रणपत्रिका आणि प्रसिद्धी साहित्यामधून शिवसेना नेते तथा राज्याचे माजी मंत्री आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत आणि धाराशिवचे खासदार ओमराजे निंबाळकर यांचे फोटो व नावे नसल्याने शिवसैनिक आणि सावंत समर्थकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली.

या कार्यक्रमाला ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे प्रमुख उपस्थिती लावणार असताना, तानाजी सावंत समर्थक असलेल्या जिल्हा परिषद सदस्यांनी कार्यक्रमावर बहिष्कार टाकल्याने राजकीय चर्चांना अधिक उधाण आले. जिल्हा परिषदेत भाजप आणि शिवसेना यांच्यातील समन्वयावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, महायुतीतील धुसफूस पुन्हा एकदा समोर आल्याची चर्चा सुरू आहे.

कार्यक्रमाच्या प्रसिद्धी फलकावर मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, ग्रामविकास मंत्री तसेच इतर नेत्यांचे फोटो झळकविण्यात आले. मात्र, धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री राहिलेले आणि जिल्ह्याच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणारे आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत तसेच विद्यमान खासदार ओमराजे निंबाळकर यांना स्थान न दिल्याने शिवसेना कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त केला. “आमदार तानाजी सावंत यांना डावलणे हेच तुमचं व्हिजन आहे का?” असा थेट सवाल जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांना करण्यात आला.

सावंत समर्थकांच्या मते, जिल्ह्याच्या विकासासाठी सातत्याने काम करणाऱ्या लोकप्रतिनिधींना जाणीवपूर्वक कार्यक्रमातून वगळण्यात आले. हा केवळ प्रोटोकॉलचा मुद्दा नसून राजकीय हेतूने घेतलेला निर्णय असल्याचा आरोपही करण्यात येत आहे. त्यामुळे जिल्हा परिषद प्रशासनाने या प्रकरणाबाबत स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही करण्यात आली आहे.

दरम्यान, या संपूर्ण प्रकरणामुळे महायुतीतील भाजप आणि शिवसेनेतील समन्वयावर पुन्हा प्रश्न उपस्थित होत आहेत. जिल्हा परिषदेच्या पहिल्याच मोठ्या कार्यक्रमात निर्माण झालेला हा वाद आगामी स्थानिक राजकारणावर परिणाम करणारा ठरू शकतो, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू आहे.

याप्रकरणी जिल्हा परिषद प्रशासन किंवा अध्यक्षा अर्चना पाटील यांची अधिकृत भूमिका अद्याप समोर आलेली नाही. तसेच आमदार तानाजीराव सावंत किंवा खासदार ओमराजे निंबाळकर यांच्या कार्यालयाकडूनही अधिकृत प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही.

Leave a Reply

error: Content is protected !!