‘आपला जीव धाराशिव व्हिजन २०३०’ हा राज्यासाठी पथदर्शी उपक्रम; निधी कमी पडू देणार नाही!

  • ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांचे उद्गार
  • झेडपी अध्यक्षा अर्चना पाटील यांच्या संकल्पनेचे व कार्यशैलीचे भरभरून कौतुक

यशश्री अपडेट्स | धाराशिव: ‘आपला जीव धाराशिव व्हिजन २०३०’ हा एक अत्यंत स्तुत्य आणि पथदर्शी उपक्रम आहे. यातील अनेक योजनांची अंमलबजावणी केवळ जिल्ह्यापुरती मर्यादित न राहता राज्य व देश पातळीवर झाली पाहिजे, असे प्रतिपादन ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे यांनी केले. जिल्हा परिषद अध्यक्षा अर्चना पाटील यांच्या नेतृत्वाखाली आयोजित विशेष कार्यशाळा आणि कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते.

या कार्यक्रमात ‘आपला जीव धाराशिव व्हिजन २०३०’ या मोहिमेची अधिकृत सुरुवात करण्यात आली, तसेच ‘आपला जीव धाराशिव’ या संकल्पना गीताचे लोकार्पणही करण्यात आले.

व्हिजन २०३० च्या पाठीशी राज्य सरकार ठाम

जयकुमार गोरे पुढे म्हणाले, “एकिकडे राज्याचे नेतृत्व मुख्यमंत्री करत असताना, दुसरीकडे विकसित धाराशिवचे स्वप्न घेऊन अर्चना पाटील तळमळीने काम करत आहेत. राज्यात अशा प्रकारचे व्हिजन प्रथमच मांडले गेले असून, या संपूर्ण संकल्पनेच्या पाठीशी राज्य सरकार ठामपणे उभे राहील. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याला तुळजाभवानी मातेचा आशीर्वाद होता, त्याच पावन भूमीतून सुरू झालेले हे व्हिजन २०३० पर्यंत नक्कीच पूर्णत्वास जाईल.” महत्त्वाच्या घोषणा:

  • पाणीप्रश्न मार्गी लागणार: कृष्णा नदीच्या पुराचे पाणी मराठवाड्याला देण्याचा निर्णय मुख्यमंत्र्यांनी घेतला आहे, ज्यामुळे धाराशिवचा पाणीप्रश्न कायमस्वरूपी सुटण्यास मदत होईल.
  • मुलांना मोबाईलच्या विळख्यातून बाहेर काढण्याचा उपक्रम: आजघडीला एकाच घरातील सर्व सदस्य एकमेकांशी बोलण्याऐवजी मोबाईलमध्ये व्यस्त असतात. अशा वेळी मुलांना मोबाईलच्या अतिवापरातून बाहेर काढण्यासाठी राबवलेला उपक्रम अत्यंत कौतुकास्पद असून, याचे राज्यभरात अनुकरण केले पाहिजे.
  • स्मशानभूमी आणि इतर सुविधा: राज्यातील आजही ८ हजार गावांमध्ये स्मशानभूमी नाही. जोपर्यंत गावांत मूलभूत सुविधा आणि स्मशानभूमी होत नाही, तोपर्यंत इतर विकासाला पूर्ण अर्थ उरणार नाही. धाराशिवने सुरू केलेली विद्युत शववाहिनी व वृक्षारोपणाची संकल्पना आदर्श आहे.
  • आशा सेविकांना CSR मधून स्कुटी: आशा सेविकांच्या उल्लेखनीय कार्याचा उल्लेख करत, त्यांना सीएसआर (CSR) निधीतून स्कुटी देण्याची आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांची योजना कौतुकास्पद असल्याचे गोरे म्हणाले. तसेच, आशा सेविका, सरपंच आणि कोतवाल यांच्या मानधनात वाढ करून सरकारने त्यांचा सन्मान केला आहे.
  • ई-लर्निंग, वाचनालय व जिम: व्हिजन २०३० मधील अभ्यासिका, वाचनालय आणि ई-लर्निंग यांमुळे नवीन पिढी घडेल. गावांत जिमला प्रोत्साहन दिल्यास आरोग्य सुधारण्यास मदत होईल.

मान्यवरांची उपस्थिती

या प्रसंगी आमदार राणाजगजीतसिंह पाटील, आमदार विक्रम काळे, जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार, मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियांवदा महाडदळकर, पोलीस अधीक्षक रितू खोखर, भाजप जिल्हाध्यक्ष दत्ताभाऊ कुलकर्णी, नगराध्यक्ष नेहा काकडे, नितीन काळे, ॲड. नितीन भोसले यांच्यासह जिल्हा परिषदेचे सभापती व सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमात जिल्हा ग्रामविकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक अनुप शेंगुलवार, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश काळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (सा.) तुकाराम भालके, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) अनंत कुंभार आणि शिक्षणाधिकारी सुधा साळुंके यांच्या हस्ते उपस्थित मान्यवरांचा सत्कार करण्यात आला.

Leave a Reply

error: Content is protected !!