- आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या ठोस प्रयत्नांमुळे धाराशिवमध्ये केंद्रीय विद्यालयाचा मार्ग मोकळा
- चुकीच्या माहितीच्या आधारे पत्रकबाजी करणाऱ्या खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि त्यांच्या कार्यकर्त्याचे हसे
यशश्री अपडेट्स | धाराशिव आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्या सातत्यपूर्ण प्रयत्नांमुळे आणि दूरदृष्टीमुळे धाराशिव येथे केंद्रीय विद्यालय (Kendriya Vidyalaya) स्थापनेचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. आमदार पाटील यांच्या सूचनेनुसार जिल्हा परिषदेच्या नवीन बॉडीने तात्पुरत्या जागेची व्यवस्था केली असून, या जागेची पाहणी करण्यासाठी केंद्रीय विद्यालय संघटनेचे (KVS) पथक धाराशिव दौऱ्यावर येत आहे. या पार्श्वभूमीवर, भाजप नेते राहुल काकडे यांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. “मागील ७ वर्षांत खासदारांना केंद्रीय विद्यालयाचा प्रश्न मार्गी लावणे अजिबात जमले नाही आणि आता काम पूर्ण होत आले असताना ते आयत्या पिठावर रेघोट्या ओढून श्रेय लाटण्याचा केविलवाणा प्रयत्न करत आहेत,” अशी घणाघाती टीका काकडे यांनी केली आहे.
दौऱ्याच्या तारखेवरून अज्ञानाची जाहीर प्रचिती
केंद्रीय विद्यालय संघटनेच्या (KVS) पथकाने प्रशासकीय कारणास्तव धाराशिव दौऱ्याच्या नियोजनात बदल केला होता. २२ जुलै रोजी कै. अजितदादा पवार यांच्या जयंतीचे कार्यक्रम असल्याने, पथकाने हा दौरा २२ ऐवजी २० जुलै असा निश्चित केला होता आणि तशी अधिकृत माहिती जिल्हा प्रशासनाला दिली होती.
परंतु, या बदलाची कोणतीही माहिती नसलेले खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर आणि त्यांचे कार्यकर्ते सोमनाथ गुरव यांनी जुन्या माहितीच्या आधारे ‘पथक २० ला नाही तर २२ जुलैला येणार’ असे चुकीचे पत्रक काढले. या चुकीच्या पत्रकबाजीमुळे खासदारांनी स्वतःची उरलीसुरली अब्रू स्वतःहून चव्हाट्यावर आणली असून संपूर्ण जिल्ह्यात त्यांचे हसे झाले आहे, असा टोला काकडे यांनी लगावला.
आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्यामुळेच कामाला गती
केंद्रीय विद्यालय सुरू करण्यासाठी केवळ आरडाओरडा न करता प्रशासकीय स्तरावर ठोस प्रयत्न करावे लागतात, हे आमदार पाटील यांनी दाखवून दिले आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली खालील महत्त्वाचे टप्पे पार पडले आहेत:
- तात्पुरती जागा: आमदार पाटील यांच्या सूचनेवरून जिल्हा परिषदेच्या नवीन बॉडीने जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेच्या (DIET) इमारतीसमोरील जिल्हा परिषद शाळेची प्रशस्त इमारत (डीआयसी रोड) तात्पुरत्या स्वरूपात देण्याचा निर्णय घेतला.
- कायमस्वरूपी जागा: शासकीय आयुर्वेद महाविद्यालयाच्या पाठीमागे असलेली ५ एकर जागा कायमस्वरूपी देण्यासाठी आमदार पाटील यांनी प्रशासनाकडून रीतसर प्रस्ताव तयार करून घेऊन तो पुढील मंजुरीसाठी शासनाकडे पाठवला आहे.
या ठोस प्रशासकीय प्रक्रियेमुळेच आज केंद्रीय विद्यालयाचे पथक जागेची पाहणी करण्यासाठी धाराशिवमध्ये येत आहे.
लोकसभेच्या त्या प्रश्नात धाराशिवचा उल्लेखच नाही!
खासदार राजेनिंबाळकर यांच्या समर्थकांकडून २०२२ मधील लोकसभेच्या एका प्रश्नाचा दाखला दिला जात आहे. यावर आक्षेप घेत राहुल काकडे यांनी म्हटले की, “लोकसभेत विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देण्यासाठी केंद्रीय पथक कधी जिल्ह्यात येत असते का? मुळात खासदारांनी २०२२ मध्ये विचारलेल्या त्या प्रश्नात ‘धाराशिव’ या नावाचा उल्लेखही नव्हता. तसेच, त्या प्रश्नाच्या उत्तराच्या शेवटच्या ओळीत स्पष्ट लिहिले आहे की, केंद्रीय विद्यालय हे केवळ राज्य, जिल्हा किंवा आकांक्षित जिल्हा या निकषांवर सुरू केले जात नाही. याचेही ज्ञान नसताना त्यांचे कार्यकर्ते उंटावरून शेळ्या हाकण्याचे काम करत आहेत.”
मार्च २०२५ च्या बैठकीची माहिती जनतेसमोर मांडा: काकडे यांचे आव्हान
खासदार गटाचे कार्यकर्ते सोमनाथ गुरव यांनी मार्च २०२५ मध्ये झालेल्या एका बैठकीचा उल्लेख आपल्या पत्रकात केला होता. यावर आव्हान देत राहुल काकडे म्हणाले की, “त्या बैठकीत जागेबाबत नेमका काय निर्णय झाला, हे गुरव यांनी सोयीस्करपणे लपवून ठेवले आहे. त्यांनी ती माहिती एकदा जिल्हावासीयांसमोर जाहीर करावी. केवळ ‘जागा द्या, जागा द्या’ म्हणून ओरडल्याने केंद्रीय विद्यालय मंजूर होत नाही, तर त्यासाठी सक्षम प्रस्ताव, प्रशासकीय पूर्तता आणि शासनाला स्वीकारता येईल अशी जमीन उपलब्ध करून देण्याची दूरदृष्टी लागते, जी फक्त आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडे आहे.”
रील बनवण्याने प्रश्न सुटत नाहीत!
“फक्त स्टंटबाजी करण्यासाठी, रील काढण्यासाठी किंवा पत्रव्यवहार केल्याचे नाटक केल्याने प्रश्न सुटत नसतात. प्रश्न मार्गी लावण्यासाठी समज आणि कामाचा आवाका लागतो, ज्याचा खासदारांकडे पूर्णपणे अभाव आहे. म्हणूनच नुकत्याच झालेल्या नगरपरिषद निवडणुकीत जनतेने त्यांना तिसऱ्या क्रमांकावर फेकले आहे. पालिकेतील या मानहानीकारक पराभवानंतर तरी यांना अक्कल येईल अशी अपेक्षा होती, मात्र ज्याचा नेताच अडाणचोट आहे, त्याच्या कार्यकर्त्याकडून काय अपेक्षा करणार? आम्ही आयत्या पिठावर रेघोट्या मारणारे लोक नसून, प्रत्येक प्रश्नाचा शेवटपर्यंत पाठपुरावा करून तो मार्गी लावणारे कार्यकर्ते आहोत,” अशा कडक शब्दांत राहुल काकडे यांनी खासदारांचा समाचार घेतला आहे.
