सेवाभावी वृत्तीचा गौरव; परंडा उपजिल्हा रुग्णालयात परिचारिका दिन साजरा

यशश्री अपडेट्स -परंडा (प्रतिनिधी) -उपजिल्हा रुग्णालय परंडा येथे जागतिक परिचारिका दिन उत्साहात साजरा करण्यात आला. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान वैद्यकीय अधीक्षक डॉ. जुबेर मोमीन यांनी भूषविले. यावेळी परिचारिका व परिचारक यांच्या आरोग्यसेवेतील अतुलनीय योगदानाचा गौरव करण्यात आला. रुग्णसेवा, मानवसेवा आणि राष्ट्रसेवा या भावनेतून रात्रंदिवस कार्यकरणाऱ्या परिचारिका व परिचारकांच्या समर्पित सेवेला यावेळी विशेष अभिवादन करण्यात आले.

कार्यक्रमात मान्यवरांनी आपल्या मनोगतात सांगितले की, आरोग्य व्यवस्था ही केवळ डॉक्टरांवर अवलंबून नसून परिचारिका व परिचारक हे तिचे अत्यंत महत्त्वाचे, संवेदनशील व भक्कम आधारस्तंभ आहेत. रुग्णालयात दाखल होणाऱ्या प्रत्येक रुग्णाला स्वतःच्या

कुटुंबातील सदस्याप्रमाणे समजून सेवा देण्याची भावना परिचारिका वर्गामध्ये दिसून येते. रुग्णाच्या वेदनेत आधार, भीतीमध्ये धीर आणि उपचार प्रक्रियेत आशा निर्माण करण्याचे महत्त्वपूर्ण कार्य परिचारिका व परिचारक बजावत असतात, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले.

विशेषतः कोरोना महामारीच्या कठीण काळात परिचारिका व परिचारकांनी स्वतःचा जीव धोक्यात घालून बजावलेली
भूमिका समाज कधीही विसरू शकणार नाही. झझए किटमध्ये तासन्तास सेवा देत रुग्णांचे प्राण वाचवण्यासाठी त्यांनी केलेले योगदान हे मानवसेवा व राष्ट्रसेवेचे प्रेरणादायी उदाहरण असल्याचे मान्यवरांनी नमूद केले.

तसेच भारतीय संस्कृतीतील रुग्णसेवा हीच ईश्वरसेवाया संकल्पनेचा उल्लेख करताना, धर्मार्थकाममोक्षाणाम् आरोग्यं मूलमुत्तमम्या उक्तीप्रमाणे उत्तम आरोग्य हेच धर्म, अर्थ, काम व मोक्ष या चार पुरुषार्थांचे मूळ

असल्याचे प्रतिपादन करण्यात व आले. डॉक्टर, परिचारिका परिचारक हे आरोग्यदानाच्या माध्यमातून समाजाला नवजीवन देण्याचे महान कार्य करीत असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

कार्यक्रमास वैद्यकीय अधीक्षक डॉ. जुबेर मोमीन, सह अधीक्षक चंद्रकांत पवार, डॉ. आनंद मोरे, इन्चार्ज सिस्टर श्रीमती शितल कुलकर्णी, श्रीमती सुलोचना कुलकर्णी, श्रीमती सातारकर गायकवाड सिस्टर, श्रीमती सिस्टर, श्रीमती थिटे, श्रीमती दुधकवडे, श्रीमती आयेशा, इमरान शेख तसेच रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी, परिचारिका, परिचारक व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या शेवटी सर्व परिचारिका भगिनी व परिचारक बंधूंना जागतिक परिचारिका दिनाच्या शुभेच्छा देत त्यांच्या सेवाभावी कार्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *