धाराशिवात अवैध शस्त्रांचा पर्दाफाश; ४ पिस्तुले जप्त, २ जण अटकेत

यशश्री अपडेट्स:धाराशिव |प्रतिनिधी

धाराशिव जिल्हा पोलीस दलाच्या स्थानिक गुन्हे शाखेने अवैध शस्त्रांविरोधातील मोठी कारवाई करत दोन आरोपींना अटक केली असून त्यांच्या ताब्यातून 4 गावठी पिस्तुले, 3 जिवंत काडतुसे आणि 1 मोटारसायकल असा एकूण 2 लाख 94 हजार 500 रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या इतिहासातील अग्निशस्त्रांबाबतची ही आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई मानली जात आहे.

पोलीस अधीक्षक रितु खोखर आणि अपर पोलीस अधीक्षक सचिन पांडकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक विनोद इज्जपवार यांच्या नेतृत्वाखाली ही कारवाई करण्यात आली. 13 जून रोजी स्थानिक गुन्हे शाखेचे पथक पेट्रोलिंग करत असताना बेंबळी-धाराशिव रस्त्यावरील साळुंखे नगर कमानीजवळ गोपनीय माहिती मिळाली. त्यानुसार बालाजी बबन काळे आणि आश्रू उर्फ भुऱ्या भिमा काळे हे दोघे मोटारसायकलवरून बेंबळीच्या दिशेने जाणार असून त्यांच्या ताब्यात अवैध गावठी पिस्तुले असल्याची माहिती पोलिसांना मिळाली.

माहितीची खातरजमा करून पोलिसांनी पंचांच्या उपस्थितीत सापळा रचला. रात्री 11 वाजण्याच्या सुमारास संशयित मोटारसायकलवरून येताना दिसताच त्यांना थांबवून झडती घेण्यात आली. यावेळी त्यांच्या ताब्यातून चार गावठी पिस्तुले व तीन जिवंत काडतुसे आढळून आली. पोलिसांनी तत्काळ शस्त्रे, काडतुसे आणि मोटारसायकल जप्त केली.

अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये बालाजी बबन काळे (रा. कल्याणनगर, भूम) आणि आश्रू उर्फ भुऱ्या भिमा काळे (रा. जॉब, ता. भूम) यांचा समावेश आहे. दोघांविरुद्ध धाराशिव शहर पोलीस ठाणे येथे भारतीय शस्त्र कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला. या कारवाईत सपोनि अमोल मोरे, पोह समाधान वाघमारे, राहुल नाईकवाडी, बळीराम शिंदे, महिला पोलीस हवालदार शोभा बांगर, पोलीस नाईक अशोक ढगारे,चापोअं दहीहांडे, शेरखाने, पोअ मुंगळेसह इतर कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *