स्टॉप डायरिया’ अभियान 16 जुन ते 31 जुलै दरम्यान – आरोग्य विभाग सज्ज, नागरिकांना आवाहन

यशश्री अपडेट्स -धाराशिव – प्रतिनिधी

बालमृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच अतिसार (डायरिया) आजारामुळे होणारे मृत्यू टाळण्याच्या उद्देशाने आरोग्य विभागामार्फत धाराशिव जिल्ह्यात 16 जून ते 31 जुलै या कालावधीत “स्टॉप डायरिया अभियान” प्रभावीपणे राबविण्यात येणार आहे. या अभियानांतर्गत पाच वर्षांखालील बालकांमध्ये अतिसार प्रतिबंध, वेळेवर उपचार व जनजागृती यावर विशेष भर दिला जाणार आहे.

स्टॉप डायरियाचे घोषवाक्य “अतिसारावर करा मात, स्वच्छता व ओआरएस ची घेऊनी साथ” असे आहे. या अभियानामध्ये जिल्ह्यातील सर्व शासकीय आरोग्य संस्था, उपकेंद्रे, प्राथमिक आरोग्य केंद्रे, ग्रामीण रुग्णालये तसेच अंगणवाडी केंद्रे आणि आशा स्वयंसेविकांच्या माध्यमातून व्यापक जनजागृती करण्यात येणार आहे. अतिसार झालेल्या प्रत्येक बालकाला तात्काळ ओआरएस द्रावण व झिंक गोळ्या उपलब्ध करून देण्यात येणार असून, त्यांचा योग्य वापर करण्याबाबत पालकांना मार्गदर्शन केले जाणार आहे.

अभियान दरम्यान घरभेटी, ग्रामसभा, शाळा व अंगणवाडी स्तरावरील जनजागृती कार्यक्रम, स्वच्छता व सुरक्षित पिण्याच्या पाण्याबाबत प्रबोधन, हात धुण्याच े महत्त्व तसेच स्तनपान आणि पूरक आहाराबाबत माहिती देण्यात येईल. अतिसाराची लक्षणे दिसताच उपचारासाठी जवळच्या शासकीय आरोग्य संस्थेत त्वरित संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात येणार आहे. या अभियानात जिल्हयातील एकूण 1 लाख 69 हजार 812 बालकाची संख्या अपेक्षित असुन यासाठी एकुन 5 हजार 815 आशा, अंगणवाडी सेविका / मदतनीस, आरोग्य कर्मचारी, व इतर अधिकारी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. तसेच हे अभियान यशस्वी करण्यासाठी जिल्हा व तालुका पातळीवर सर्व अधिकारी व कर्मचारी यांचा सहभाग राहणार आहे.

अतिसार झाल्यास बालकाला भरपूर द्रवपदार्थ, ओआरएस द्रावण व डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार झिक गोळ्या देणे आवश्यक असून, स्तनपान सुरू ठेवावे आणि बालकाला निर्जलीकरणाची लक्षणे दिसल्यास तातडीने आरोग्य केंद्रात दाखल करावे, असे आवाहन जिल्हा माता बाल संगोपण अधिकारी डॉ कुलदिप मिटकरी यांनी केले आहे.

जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सतीश हरिदास यांनी नागरिकांना आवाहन केले आहे की, पाच वर्षाखालील बालकांचे अतिसारा पासून संरक्षण करण्यासाठी स्वच्छतेच्या सवयी अंगीकाराव्यात. सुरक्षित पिण्याच्या पाण्याचा वापर करावा तसेच स्टॉप डायरिया अभियानात सक्रिय सहभाग घेऊन बालकांच्या आरोग्याचे संरक्षण करण्यास सहकार्य करावे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *