एकनाथ शिंदेंविरोधात एकेरी भाषा खपवून घेतली जाणार नाही, असा इशारा दिल्यानंतर वातावरण तापले; धाराशिवहून परंड्याकडे जात असताना पागरीमध्ये ताफा अडवून घोषणाबाजी
यशश्री अपडेट्स | धाराशिव :
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्यातील राजकीय आणि सामाजिक वातावरण तापलेले असतानाच धाराशिव जिल्ह्यात शुक्रवारी मराठा कार्यकर्त्यांनी आक्रमक भूमिका घेतली. राज्याचे मंत्री योगेश कदम यांच्या विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या ताफ्याला अडवून काळे झेंडे दाखविण्यात आले. धाराशिवहून परंड्याकडे जात पगारी मध्ये असताना हा प्रकार घडल्याची माहिती समोर आली आहे.
मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर योगेश कदम यांनी काही दिवसांपूर्वी मनोज जरांगे पाटील यांच्या भूमिकेवर प्रतिक्रिया देताना मुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे यांच्याविरोधात एकेरी भाषा वापरल्यास ते सहन केले जाणार नाही, असा इशारा दिला होता. त्यांच्या या वक्तव्यावरून मराठा कार्यकर्त्यांमध्ये नाराजी निर्माण झाल्याचे सांगण्यात येत आहे.
याच पार्श्वभूमीवर धाराशिवमध्ये मराठा कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पाहायला मिळाले. योगेश कदम यांचा ताफापगारी मधून परंड्याकडे जात असताना मराठसेवकांनी तो अडवला. यावेळी काळे झेंडे दाखवत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली. काही काळ या ठिकाणी तणावाचे वातावरण निर्माण झाले.
वक्तव्यावरून मराठा कार्यकर्त्यांचा संताप

मनोज जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या मराठा आरक्षणाच्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर नेत्यांच्या वक्तव्यांवर कार्यकर्त्यांकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. योगेश कदम यांच्या इशाऱ्यानंतर मराठा कार्यकर्त्यांनी नाराजी व्यक्त करत त्यांच्याविरोधात आंदोलनात्मक भूमिका घेतल्याचे या घटनेतून दिसून आले.

धाराशिव जिल्ह्यात यापूर्वीही मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी विविध ठिकाणी आंदोलने, बंद आणि निषेधाच्या माध्यमातून कार्यकर्त्यांनी आपली भूमिका मांडली आहे. त्यामुळे योगेश कदम यांच्या ताफ्याला अडवून काळे झेंडे दाखविल्याच्या घटनेने जिल्ह्यातील राजकीय वातावरण पुन्हा तापण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.
घोषणाबाजीमुळे काही काळ तणाव

ताफा अडवल्यानंतर मराठा कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी केली. कार्यकर्त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे काही काळ परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले. परिस्थिती नियंत्रणात ठेवण्यासाठी संबंधित यंत्रणेकडून खबरदारी घेण्यात आल्याची माहिती आहे.
दरम्यान, या घटनेनंतर योगेश कदम किंवा त्यांच्या समर्थकांकडून काय प्रतिक्रिया दिली जाते, तसेच पोलिसांकडून या प्रकाराबाबत कोणती कारवाई केली जाते, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून सुरू असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर धाराशिवमधील या घटनेमुळे राजकीय वातावरण आणखी तापण्याची चिन्हे दिसत आहेत.
