यशश्री अपडेट्स |धाराशिव
“फुकटचे श्रेय घेण्याची आमदार राणाजगजितसिंह पाटील यांची जुनीच खोड आहे. परंतु, केंद्रीय विद्यालयाच्या बाबतीत ते चांगलेच तोंडावर आपटले आहेत. कोणताही प्रत्यक्ष पाठपुरावा नसताना, केवळ अर्धवट माहितीच्या आधारे पत्रक काढून श्रेय घेण्याचे धंदे त्यांनी आता बंद करावेत,” असा घणाघाती इशारा शिवसेना नेते सोमनाथ गुरव यांनी दिला आहे.
खासदार ओमराजे निंबाळकरांचा २०२२ पासून पाठपुरावा
याबाबत सविस्तर माहिती देताना सोमनाथ गुरव म्हणाले की, धाराशिव येथे केंद्रीय विद्यालय सुरू व्हावे यासाठी खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर हे २०२२ पासून सातत्याने पाठपुरावा करत आहेत. लोकसभेच्या इतिवृत्तामध्ये (रेकॉर्डवर) याचे स्पष्ट पुरावे पाहायला मिळतील. राणा पाटील यांच्यासारखी ही केवळ हवेतली पतंगबाजी नसून, खासदार ओमराजेंनी २०२२ च्या लोकसभा अधिवेशनात यासंदर्भात थेट लक्षवेधी सूचना मांडली होती.
या महत्त्वपूर्ण विषयावर आतापर्यंत दोन विशेष बैठका पार पडल्या असून, आगामी संसदेच्या अधिवेशनात २७ तारखेला हाच प्रश्न उत्तरासाठी पटलावर येणार आहे. केंद्र सरकारच्या स्तरावर या प्रश्नावर ९ जुलै रोजीच निर्णय झाला असून, त्याच पार्श्वभूमीवर शासकीय हालचालींना वेग आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून केंद्रीय पथक जागेची पाहणी करण्यासाठी येत असल्याचे गुरव यांनी स्पष्ट केले.
मार्च २०२५ च्या बैठकीचा शासकीय पुरावा
“या प्रक्रियेला गती देण्यासाठी मार्च २०२५ मध्ये जिल्हाधिकारी कार्यालयात एक अत्यंत महत्त्वाची बैठक पार पडली होती. या बैठकीत केंद्रीय विद्यालय स्थापनेसाठी जागेची निवड करणे, आवश्यक प्रस्ताव तातडीने दिल्लीला पाठवणे आणि पुढील प्रशासकीय प्रक्रिया गतिमान करणे यावर सविस्तर चर्चा झाली. हे सर्व शासकीय पुराव्यानिशी सिद्ध करता येण्यासारखे आहे. असे असताना, केवळ एक पत्रक काढून श्रेय लाटण्याचा प्रयत्न करणे हा आमदार महोदयांचा शुद्ध बालीशपणा आहे,” असा टोलाही त्यांनी लगावला.
“आमदारांनी आपली राहिली-साहिली अक्कल दाखवून दिली”
राणा पाटील यांच्यावर खोचक टीका करताना सोमनाथ गुरव म्हणाले की, “सगळ्यात हास्यास्पद आणि खोटारडेपणाची हद्द म्हणजे केंद्रीय पथक पाहणीसाठी कधी येणार, हे सांगण्याची आमदारांना एवढी घाई झाली की त्यांनी कोणतीही खातरजमा न करता घाईघाईने प्रेस नोट (पत्रक) प्रसिद्ध केली. यातून त्यांनी आपली राहिली-साहिली अक्कल दाखवून दिली आहे.”
ते पुढे म्हणाले की, “आमदारांच्या माहितीसाठी सांगतो, केंद्रीय पथक २२ जुलै रोजी पाहणीसाठी धाराशिवला येत आहे. त्यामुळे आता आमदारांनी ‘तारखेत बदल झाला आहे’ असे सांगणारे आणखी एक सुधारित पत्रक काढावे, जेणेकरून ते त्यांच्या नेहमीच्या धरसोडीच्या स्वभावाला नक्कीच शोभेल.”
या पत्रकबाजीमुळे धाराशिवच्या राजकीय वर्तुळात केंद्रीय विद्यालयाच्या श्रेयाचा वाद आता चांगलाच पेटण्याची चिन्हे दिसत आहेत.
