पालकमंत्री प्रताप सरनाईक यांचा शेतकऱ्यांना भावनिक आधार; दोन लाख कुटुंबांना दिवाळी शिधा वाटपाचा उपक्रम
यशश्री अपडेट्स | धाराशिव, दि. ३ नोव्हेंबर :
धाराशिव जिल्ह्यात दुष्काळाचे संकट अधिक गडद होत असताना शेतकऱ्यांनी कोणत्याही परिस्थितीत खचून जाऊ नये. तुमच्या प्रत्येक संकटात उपमुख्यमंत्री तथा शिवसेनेचे मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्यासारखा खंबीर कुटुंबप्रमुख तुमच्या पाठीशी उभा आहे. संकट कितीही मोठे असले, तरी शिवसेना शेतकऱ्यांना कधीही एकटे पडू देणार नाही, असा भावनिक विश्वास परिवहन मंत्री तथा धाराशिवचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी व्यक्त केला.
‘मदतीचे तोरण, हेच शिवसेनेचे धोरण’ या संकल्पनेतून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार धाराशिव जिल्ह्यातील तब्बल दोन लाख कुटुंबांना दिवाळी शिधा वाटपाचा उपक्रम राबविण्यात येत आहे. दुष्काळाच्या झळा सोसणाऱ्या शेतकरी आणि गोरगरीब कुटुंबांच्या घरातही दिवाळीचा आनंद पोहोचावा, या उद्देशाने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे.
या उपक्रमांतर्गत ३ नोव्हेंबर रोजी धाराशिव शहरातील सांजा परिसरातील एका मंगल कार्यालयात आयोजित कार्यक्रमात शेतकरी आणि त्यांच्या कुटुंबीयांना दिवाळी शिध्याचे वाटप करण्यात आले. यावेळी माजी आमदार ज्ञानराज चौगुले, डॉ. जयप्रकाश राजेनिंबाळकर, सूरज साळुंके यांच्यासह विविध मान्यवर, शिवसेनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिक उपस्थित होते.
शेतकऱ्यांना आर्थिक मदतीसोबत मानसिक आधाराचीही गरज

यावेळी बोलताना पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी दुष्काळामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर भाष्य केले. शेतकरी हा केवळ अन्नदाता नसून संपूर्ण ग्रामीण अर्थव्यवस्थेचा कणा आहे. मात्र, निसर्गाच्या लहरीपणामुळे शेतीचे मोठे नुकसान होत असून शेतकरी कुटुंबांसमोर आर्थिक अडचणी निर्माण झाल्या आहेत. अशा परिस्थितीत शेतकऱ्यांना केवळ आर्थिक मदत देऊन चालणार नाही, तर त्यांच्या मनातील नैराश्य दूर करून त्यांना मानसिक बळ देणेही तितकेच महत्त्वाचे आहे, असे त्यांनी स्पष्ट केले.
“दुष्काळाचे संकट दिवसेंदिवस अधिक तीव्र होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आज दिली जाणारी मदत ही केवळ सुरुवात आहे. या संपूर्ण संकटाच्या काळात शिवसेनेचा प्रत्येक कार्यकर्ता शेतकऱ्यांच्या दारापर्यंत पोहोचेल. त्यांच्या अडचणी समजून घेईल आणि आवश्यक ती मदत करण्यासाठी तत्पर राहील. शासनाकडूनही वेळोवेळी मदत मिळत राहील. मात्र, शेतकऱ्यांच्या मनातील नैराश्य दूर करून त्यांना पुन्हा उभे करण्यासाठी सर्वांनी एकत्रित प्रयत्न करणे गरजेचे आहे,” असे सरनाईक म्हणाले.
कर्जवसुलीच्या नावाखाली शेतकऱ्यांना त्रास दिल्यास कारवाईचा इशारा
दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर काही शेतकऱ्यांना मायक्रोफायनान्स संस्थांच्या अधिकाऱ्यांकडून कर्जवसुली आणि व्याजाच्या पैशांसाठी त्रास दिला जात असल्याच्या तक्रारी समोर आल्याचे पालकमंत्री सरनाईक यांनी सांगितले. आधीच पिकांचे नुकसान, आर्थिक विवंचना आणि दुष्काळाच्या संकटामुळे शेतकरी अडचणीत असताना त्यांच्यावर कर्जवसुलीसाठी दबाव टाकणे योग्य नाही, अशी भूमिका त्यांनी मांडली.
“शेतकरी आधीच दुष्काळाच्या संकटाशी झुंज देत आहेत. अशा परिस्थितीत त्यांना कर्जवसुली आणि व्याजासाठी त्रास देणे अमानवी आहे. शासनाचा प्रतिनिधी म्हणून मी स्पष्ट सांगतो की, संकटाच्या काळात शेतकऱ्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करणाऱ्यांची गय केली जाणार नाही,” असा सज्जड इशाराही त्यांनी दिला.
शेतकरी कुटुंबातील लग्नाची जबाबदारीही पालकमंत्री स्वीकारणार!

दुष्काळामुळे शेतकरी कुटुंबातील आनंदाचे क्षण हिरावले जाऊ नयेत, यासाठी पालकमंत्री सरनाईक यांनी विशेष संवेदनशील भूमिका मांडली. शेतकऱ्यांच्या घरात मुला-मुलींचे लग्नकार्य असेल, तर केवळ आर्थिक अडचणींमुळे ते थांबता कामा नये. अशा प्रसंगी शेतकरी कुटुंबाला आधार देण्यासाठी आपण पुढाकार घेऊ, अशी ग्वाही त्यांनी दिली.
दुष्काळामुळे शेतकऱ्यांच्या संसारावर आर्थिक संकट कोसळले असले, तरी त्यांच्या घरातील सुख-दुःखात सहभागी होऊन त्यांना आधार देणे ही लोकप्रतिनिधी आणि सामाजिक कार्यकर्त्यांची जबाबदारी आहे, असेही त्यांनी अधोरेखित केले.
दोन लाख कुटुंबांच्या घरात दिवाळीचा आनंद पोहोचविण्याचा प्रयत्न

‘मदतीचे तोरण, हेच शिवसेनेचे धोरण’ या उपक्रमाच्या माध्यमातून जिल्ह्यातील दोन लाख कुटुंबांपर्यंत दिवाळी शिधा पोहोचविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. सणासुदीच्या काळात आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही कुटुंबाचा आनंद हिरावला जाऊ नये, ही या उपक्रमामागील भावना आहे.
दुष्काळाच्या संकटात शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांच्या पाठीशी उभे राहून त्यांना दिलासा देण्याचा प्रयत्न या उपक्रमातून केला जात आहे. केवळ शिधावाटपापुरता हा उपक्रम मर्यादित न ठेवता शेतकऱ्यांच्या अडचणी समजून घेणे, त्यांना मानसिक आधार देणे आणि संकटाच्या काळात त्यांच्या कुटुंबाला मदतीचा हात देणे, हा यामागील व्यापक उद्देश असल्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी आपल्या भाषणातून स्पष्ट केले.
