​धाराशिव जिल्हा सहकार बोर्डाच्या चेअरमनपदी अभिलाष लोमटे; आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्याकडून सत्कार

यशश्री अपडेट्स|परंडा

धाराशिव जिल्हा सहकार बोर्डाच्या चेअरमनपदी निवड झालेले श्री. अभिलाष लोमटे यांनी नवनिर्वाचित संचालक श्री. ओम नाईकवाडी यांच्यासह परंडा येथील भाजपा संपर्क कार्यालयात भाजपा नेते व माननीय आमदार श्री. सुजितसिंह ठाकूर यांची सदिच्छा भेट घेतली. याप्रसंगी आ. सुजितसिंह ठाकूर यांनी दोघांचाही फेटा बांधून, शाल आणि पुष्पहार घालून जाहीर सत्कार केला व त्यांच्या पुढील वाटचालीस भरघोस शुभेच्छा दिल्या.

इतिहासातील सर्वात तरुण चेअरमन!

सन १९५८ साली स्थापन झालेल्या धाराशिव जिल्हा सहकार बोर्डाला मोठा ऐतिहासिक वारसा आहे. या बोर्डाच्या आतापर्यंतच्या इतिहासामध्ये सर्वात तरुण चेअरमन होण्याचा बहुमान मिळवून अभिलाष लोमटे यांनी एक नवा इतिहास रचला आहे. अभिलाष लोमटे हे ‘सहकार भारती’चे धाराशिव जिल्हा महामंत्री, ‘जिल्हा व्यापारी महासंघ’ व ‘एकता परिवार’चे सचिव म्हणूनही कार्यरत असून, त्यांचा संघटनात्मक क्षेत्रातील अनुभव दांडगा आहे.

सहकार क्षेत्रात पारदर्शकता आणणार: अभिलाष लोमटे

धाराशिव जिल्हा सहकार बोर्ड ही जिल्ह्यातील सहकारी संस्थांचे पदाधिकारी, संचालक, सभासद आणि कर्मचाऱ्यांना दर्जेदार शिक्षण आणि प्रशिक्षण देणारी एक प्रमुख मार्गदर्शक संस्था आहे. सहकार चळवळ अधिक बळकट, गतिमान आणि लोकाभिमुख करण्यासाठी ही संस्था काम करते.

आमदार सुजितसिंह ठाकूर यांच्याशी झालेल्या सदिच्छा चर्चेदरम्यान नवनिर्वाचित चेअरमन अभिलाष लोमटे यांनी आपला संकल्प बोलून दाखवला. ते म्हणाले,

“माझ्या कार्यकाळात जिल्ह्यातील सहकार क्षेत्रात अधिक पारदर्शकता आणण्यावर माझा भर असेल. यासाठी सहकार क्षेत्रातील लोकप्रतिनिधींना गुणवत्तापूर्ण व आधुनिक प्रशिक्षण देण्याचा माझा दृढ मनोदय आहे.”

प्रमुख नेत्यांची उपस्थिती

या महत्त्वपूर्ण सत्कार सोहळ्याच्या प्रसंगी भाजपा परंडा तालुका अध्यक्ष तथा बाजार समितीचे संचालक श्री. अरविंदबप्पा रगडे यांच्यासह भागातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. अभिलाष लोमटे यांच्या निवडीमुळे जिल्ह्याच्या सहकार वर्तुळातून आणि तरुण वर्गातून त्यांच्यावर कौतुकाचा वर्षाव होत आहे.

Leave a Reply