परंडा : शहरातील सार्वजनिक रस्ते, मोकळ्या जागा आणि ऐतिहासिक किल्ला परिसरातील अतिक्रमणांवर आता नगरपरिषदेने थेट कारवाईचा बडगा उगारला आहे. परंडा किल्ल्याकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यासह शहरातील विविध भागांतील अतिक्रमणे हटविण्यासाठी नगरपरिषदेची विशेष मोहीम १६ मे रोजी सकाळी १० वाजल्यापासून सुरू होणार असल्याची माहिती मुख्याधिकारी मनीषा वड्डेपल्ली यांनी दिली आहे.
नगरपरिषदेच्या प्रसिद्धीपत्रकानुसार, सार्वजनिक रस्त्यांवर उभारण्यात आलेली अनधिकृत बांधकामे, फेरीवाले, टपऱ्या तसेच रहदारीस अडथळा ठरणारी सर्व अतिक्रमणे हटविण्यात येणार आहेत. प्रशासनाने अतिक्रमणधारकांना अंतिम इशारा देत स्वतःहून अतिक्रमण काढून घेण्याचे आवाहन केले आहे. अन्यथा नगरपरिषदेचे पथक थेट कारवाई करून संबंधितांचा मुद्देमाल जप्त करणार असून कारवाईचा खर्चही संबंधितांकडून वसूल करण्यात येणार आहे.
पुन्हा अतिक्रमण केल्यास थेट गुन्हा
नगरपरिषद प्रशासनाने स्पष्ट शब्दांत इशारा दिला आहे की, एकदा कारवाई झाल्यानंतर त्याच ठिकाणी पुन्हा अतिक्रमण केल्यास संबंधितांविरोधात कायदेशीर गुन्हा दाखल करण्यात येईल. त्यामुळे अतिक्रमणधारकांमध्ये खळबळ उडाली आहे.
किल्ला परिसर मोकळा करण्यावर भर
ऐतिहासिक परंडा किल्ला परिसरात वाढलेल्या अतिक्रमणांमुळे पर्यटक आणि नागरिकांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागत होता. सार्वजनिक रस्ते अरुंद झाल्याने वाहतूक कोंडीची समस्या दिवसेंदिवस गंभीर बनत होती. याच पार्श्वभूमीवर नगरपरिषदेने कठोर पाऊल उचलत मोठी हटाव मोहीम जाहीर केली आहे.
“नागरिकांनी प्रशासनाला सहकार्य करावे”
शहरातील वाहतूक सुरळीत करण्यासाठी आणि सार्वजनिक जागा मोकळ्या करण्यासाठी ही मोहीम राबवली जात असल्याचे सांगत मुख्याधिकारी मनीषा वड्डेपल्ली यांनी नागरिकांना सहकार्य करण्याचे आवाहन केले आहे. “स्वतःहून अतिक्रमण काढल्यास अनावश्यक कारवाई टाळता येईल,” असेही त्यांनी स्पष्ट केले.
