यशश्री अपडेट्स |परंडा (प्रतिनिधी): परंडा तालुक्यातील सोनारी येथील जिल्हा परिषद माध्यमिक शाळेतील शिक्षकांच्या रिक्त पदांचा मुद्दा आता चांगलाच पेटला असून, यावरून संपूर्ण परंडा तालुक्यासह उस्मानाबाद (धाराशिव) जिल्ह्यात खळबळ उडाली आहे.
नेमकी घटना काय?
सोनारी येथील माध्यमिक शाळेत इयत्ता नववी आणि दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी गणित व विज्ञान विषयांच्या शिक्षकांची पदे बऱ्याच दिवसांपासून रिक्त होती. योग्य शिक्षक मिळावेत या मागणीसाठी गुरुवारी (३० जुलै) संतापलेल्या पालकांनी शाळेला टाळे ठोकून विरोध दर्शवला होता
.


पालकांच्या या आंदोलनानंतर शिक्षण विभाग तातडीने हरकतीत आला. परंडा येथील गटशिक्षणाधिकाऱ्यांनी वरिष्ठांच्या आदेशानुसार सोनारी शाळेतील रिक्त पदासाठी तातडीने शिक्षकाची नियुक्ती केली. मात्र, या नियुक्तीमुळे समस्येचे निवारण होण्याऐवजी नवीनच गोंधळ सुरू झाला.
पालक आणि लोकप्रतिनिधींचा संताप

शिक्षणाधिकाऱ्यांनी नववी व दहावीच्या वर्गांना गणित-विज्ञान शिकवण्यासाठी ज्या शिक्षकाची नियुक्ती केली, ते शिक्षक त्या विषयांसाठी पात्रताधारक (DEd/फक्त ८ वी पर्यंतच्या पात्रतेचे) नव्हते. नववी-दहावीसाठी आवश्यक पदवीधर/पात्रताधारक शिक्षक न देता, शिक्षण विभागाने ही निव्वळ मलमपट्टी आणि नियमबाह्य समायोजन केल्याचा आरोप करत पालकांनी आणि ग्रामस्थांनी तीव्र संताप व्यक्त केला.
जि. प. सदस्य धनंजय सावंत आक्रमक

शुक्रवारी (३१ जुलै) सकाळी जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत यांनी परंडा गटशिक्षण कार्यालयाला भेट देऊन प्रभारी गटशिक्षणाधिकाऱ्यांना या नियमबाह्य समायोजनाबद्दल उघडे पाडले आणि प्रश्नांचा भडीमार करत चांगलेच झापले.
धनंजय सावंत याचे मुख्य मुद्दे व आरोप:
- नियमबाह्य कारभार: सावंत यांनी विचारणा केली की, “हे समायोजन करण्यासाठी तुमच्याकडे कुठला लेखी आदेश किंवा शासनाचा जीआर (GR) आहे का? केवळ अधिकाऱ्यांच्या बैठकीतील प्रोसिडिंगच्या आधारे तुम्ही हे नियमबाह्य बदल करून शिक्षकांवर आणि विद्यार्थ्यांवर अन्याय करत आहात.”
- एका ठिकाणचा खड्डा दुसऱ्या ठिकाणी बुजवण्याचा प्रकार: “ज्या शाळेत आधीच ८ वी पर्यंत शिक्षक कमी आहेत, तिथला शिक्षक उचलून दुसरीकडे पाठवायचा आणि ती शाळा बंद पाडायची, हा कसला कारभार? लोकप्रतिनिधींचे प्रेशर आले म्हणून ‘ह्याला उचल तिकडे घाल, त्याला उचल तिकडे घाल’ हा प्रकार तातडीने बंद करा,” असा इशारा त्यांनी दिला.
- सरकारी शाळा मोडीत काढण्याचा कट? सावंत पुढे म्हणाले की, ” जवळा , चिंचपूर, कौडगाव आणि सोनारी यांसारख्या मोठ्या पटसंख्या (२५० ते ३५० विद्यार्थी) असलेल्या शाळांमध्ये शिक्षकच दिले जात नाहीत. कौडगावसारख्या शाळेतून २५-३० मुले पोलीस खात्यात गेली आहेत, अशा चांगल्या शाळांमध्ये शिक्षकांची पदे रिक्त ठेवून सरकारला जिल्हा परिषदेच्या शाळा मोडीत काढायच्या आहेत का? विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये घालवण्यासाठीच हा घाट घातला जात आहे का?”
सध्याची परिस्थिती
पात्रताधारक शिक्षक मिळेपर्यंत माघार न घेण्याच्या भूमिकेवर पालक आणि लोकप्रतिनिधी ठााम आहेत. शिक्षण विभागाच्या या उथळ निर्णयामुळे सोनारीसह परिसरातील शैक्षणिक वातावरणात मोठे वादळ निर्माण झाले असून, आता या प्रकरणात शिक्षण विभाग काय कारवाई करतो आणि सोनारीच्या शाळेला योग्य पात्रताधारक शिक्षक मिळतात का, याकडे संपूर्ण तालुक्याचे लक्ष लागले आहे.
तर दुसरी कडे शिक्षक नसल्याने चिमुकल्यांनी ‘सीईओ’च्या दालनासमोरच भरवली शाळा; धाराशिव जिल्हा परिषदेत सोनारी ग्रामस्थांचे आक्रमक आंदोलन चालू आहे.

