सोनारीतील विद्यार्थ्यांच्या ‘गांधीगिरी’ आंदोलनाला यश; जिल्हा परिषद मुख्याधिकाऱ्यांच्या दालनाबाहेर शाळा भरवल्यानंतर अखेर शिक्षक नियुक्त

परंडा तालुक्यातील सोनारी जि. प. शाळेत गणित-विज्ञान शिक्षकाची तात्पुरती नियुक्ती; ग्रामस्थ आणि विद्यार्थ्यांच्या ठाम भूमिकेमुळे प्रशासनाला नमते घ्यावे लागले.

यशश्री अपडेट्स|धाराशिव:

परंडा तालुक्यातील सोनारी येथील जिल्हा परिषद उच्च प्राथमिक व माध्यमिक शाळेतील शिक्षकांच्या रिक्त पदांवरून पेटलेला वाद अखेर पूर्णपणे निवळला आहे. गेल्या काही दिवसांपासून गणित आणि विज्ञान यांसारख्या महत्त्वाच्या विषयांचे शिक्षक नसल्याने विद्यार्थ्यांचे मोठे शैक्षणिक नुकसान होत होते. या समस्येकडे प्रशासनाचे लक्ष वेधण्यासाठी विद्यार्थी आणि पालकांनी पुकारलेल्या आंदोलनाला अखेर यश आले असून, जिल्हा परिषद प्रशासनाने तातडीने शिक्षकाच्या नियुक्तीचा आदेश जारी केला आहे.

​आंदोलनाची पार्श्वभूमी: शाळेला कुलूप ते जिल्हा परिषदेत वर्ग

​सोनारी येथील जिल्हा परिषद शाळेत गणित व विज्ञान विषयासाठी पूर्णवेळ शिक्षक उपलब्ध नव्हते. वारंवार विनंत्या करूनही प्रशासनाकडून योग्य ती दखल घेतली जात नसल्याने संतप्त ग्रामस्थांनी सर्वप्रथम शाळेला कुलूप ठोकून आपला विरोध दर्शवला.

​त्यानंतरही तोडगा न निघाल्याने शुक्रवारी विद्यार्थी आणि पालकांनी थेट धाराशिव येथील जिल्हा परिषद कार्यालय गाठले. तेथे मुख्य कार्यकारी अधिकारी (CEO) प्रियंवदा म्हाडदळकर यांच्या दालनाबाहेरच विद्यार्थ्यांनी चटया अंथरून प्रत्यक्ष शाळा भरवली. “आम्हाला शिक्षक द्या, तरच आम्ही माघार घेऊ!” अशा घोषणांनी संपूर्ण जिल्हा परिषद परिसर दणाणून गेला होता. विद्यार्थ्यांच्या या अनोख्या ‘गांधीगिरी’ आंदोलनाची जिल्हाभरात जोरदार चर्चा सुरू झाली.

विद्यार्थ्यांच्या या तीव्र आंदोलनाची गंभीर दखल घेत आमदार प्रा. डॉ. तानाजीराव सावंत यांनी तत्काळ जिल्हा प्राथमिक शिक्षण अधिकारी रवींद्र खंदारे यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. “विद्यार्थ्यांच्या भविष्याशी आणि शिक्षणाशी कोणतीही तडजोड खपवून घेतली जाणार नाही,” असा थेट इशारा देत त्यांनी सोनारी शाळेत त्वरित शिक्षक उपलब्ध करून देण्याचे कडक निर्देश दिले.

परंडा तालुक्यातील सोनारी येथील जिल्हा परिषद शाळेतील गणित व विज्ञान विषयाच्या शिक्षकांच्या रिक्त पदांवरून सुरू असलेला गोंधळ थांबण्याऐवजी अधिकच चिघळला होता विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर प्रशासनाने तातडीने काढलेला शिक्षक नियुक्तीचा आदेश नियमांना धरून नसल्याचे समोर आल्याने सकाळी काढलेले शिक्षण अधिकारी याचे आदेश दुपारी रद्द करण्यात आले व यामुळेच काही काळ नवा वाद निर्माण झाला होता या नियमबाह्य नियुक्तीवरून जिल्हा परिषद सदस्य धनंजय सावंत यांनी परंडा गटशिक्षणाधिकाऱ्यांना (BEO) चांगलेच झापले, दबाव वाढल्यानंतर परंडा शिक्षण विभागाला  ती अनधिकृत नियुक्ती रद्द केल्या . त्यानंतर जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांनी दुसरा आदेश काढला.

​प्रशासकीय हालचाली व नियुक्तीचा आदेश

लोकप्रतिनिधींचा हस्तक्षेप आणि विद्यार्थ्यांचा वाढता दबाव लक्षात घेता, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी प्रियंवदा म्हाडदळकर यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षण विभागाने तातडीने चक्रे हलवली. शिक्षण विभागाने ३१ जुलै २०२६ रोजी अधिकृत आदेश जारी केला.

​या आदेशानुसार:

  • नियुक्त शिक्षक: श्री. नितीन कोंडीबा गायसमुद्रे (माध्यमिक शिक्षक)
  • मूळ शाळा: जिल्हा परिषद प्रशाला, कळंब
  • नवी जबाबदारी: जि. प. प्रशाला सोनारी (ता. परंडा) येथे तात्पुरत्या स्वरूपात विज्ञान व गणित विषयाचे अध्यापन.

​विद्यार्थी व पालकांमध्ये आनंदाचे वातावरण

​विद्यार्थ्यांचे हे अनोखे आंदोलन, पालकांचा खंबीर पाठपुरावा आणि लोकप्रतिनिधींच्या त्वरित हस्तक्षेपामुळे अवघ्या २४ तासांत हा प्रश्न मार्गी लागला. प्रशासनाने शिक्षक नियुक्तीचे पत्र हातात दिल्यानंतर विद्यार्थ्यांनी आंदोलन मागे घेतले. योग्य वेळी शिक्षक मिळाल्याने सोनारीतील विद्यार्थी, पालक आणि ग्रामस्थांनी अखेर समाधान व्यक्त केले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!