यशश्री अपडेट्स : धाराशिव (प्रतिनिधी)
कै. पवनराजे निंबाळकर व त्यांचे चालक समद काझी यांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणात डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व नऊ आरोपींची न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी अनेक महत्त्वपूर्ण दावे केले. या प्रकरणाचा फेरतपास व्हावा आणि खरे आरोपी कोण आहेत, हे समोर यावे, अशी मागणी त्यांनी केली.
यावेळी डॉ. पाटील यांचे नातू मल्हार व मेघ पाटील, सतीश दंडनाईक, नगरसेवक राहुल काकडे, सुजित साळुंके यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
आमदार राणाजगजीतसिंह पाटील म्हणाले की, कै. पवनराजे व समद काझी यांच्या दुर्दैवी हत्येला २० वर्षे पूर्ण होत आली असून, गेली १७ वर्षे या प्रकरणाची न्यायालयीन प्रक्रिया सुरू होती. न्यायव्यवस्थेवर आमचा सुरुवातीपासूनच विश्वास होता आणि अखेर आम्हाला न्याय मिळाला. मात्र, या सर्व आरोपींची १७ वर्षे कोण परत करणार, असा सवाल त्यांनी उपस्थित केला.
डॉ. पद्मसिंह पाटील यांना गेली अनेक वर्षे मानसिक आणि शारीरिक त्रास सहन करावा लागला. या प्रकरणाशी थेट संबंध नसतानाही त्यांना राजकीय षडयंत्रातून अडकवण्यात आले, असा दावा त्यांनी केला. टप्प्याटप्प्याने अनेक गोष्टी समोर येतील आणि योग्य वेळी याबाबत सविस्तर भाष्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.
“१९९० च्या दशकात डॉ. पद्मसिंह पाटील मुख्यमंत्री होण्याच्या शर्यतीत होते. त्यानंतर खासदार झाल्यावर केंद्रीय मंत्रिमंडळ विस्ताराच्या पार्श्वभूमीवर हे षडयंत्र रचले गेले,” असा आरोपही त्यांनी केला.
या प्रकरणाचा सखोल तपास झाल्यास खरे आरोपी कोण आहेत, हे आजही समोर येऊ शकते, असा विश्वास व्यक्त करत पवनराजे यांच्या हत्येचा फेरतपास करण्याची मागणी त्यांनी केली. “ही हत्या नेमकी कोणी आणि कोणत्या कारणासाठी केली, याचा शोध लागला पाहिजे,” असे ते म्हणाले.
२००६ मध्ये ही दुर्दैवी घटना घडल्यानंतर लगेचच तिचे राजकारण करण्यात आले. काही जणांना सांगण्यावरून भूमिका घ्यायला लावण्यात आली आणि या घटनेचा राजकीय फायद्यासाठी वापर करण्यात आल्याचा आरोपही त्यांनी केला.
“षडयंत्र कोणी, कधी, कसे आणि कशासाठी रचले, याबाबतची बरीच माहिती माझ्याकडे आहे. मात्र, त्याविषयी कधी बोलायचे आणि कोणते पुरावे सादर करायचे, हे मी योग्य वेळी ठरवेन,” असे सांगत न्यायालयाचा संपूर्ण आदेश अभ्यासल्यानंतर याबाबत अधिक सविस्तर भूमिका मांडणार असल्याचे आमदार राणाजगजीतसिंह पाटील यांनी स्पष्ट केले.
या काळात साथ देणाऱ्या सर्वांचे त्यांनी आभार मानले. तसेच आई तुळजाभवानी आणि संत गोरोबा काका यांच्या आशीर्वादामुळे न्याय मिळाल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.

