यशश्री अपडेट्स : मुंबई (प्रतिनिधी)
अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागलेल्या कै. पवनराजे निंबाळकर दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा अखेर 20 वर्षांनंतर निकाल लागला असून, सीबीआयच्या विशेष न्यायालयाने माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह सर्व आरोपींची निर्दोष मुक्तता केली आहे. या निकालानंतर पद्मसिंह पाटील यांच्या कुटुंबातून पहिली प्रतिक्रिया समोर आली असून, त्यांच्या सून अर्चना पाटील यांनी भावूक होत समाधान व्यक्त केले.
महाराष्ट्राच्या राजकारणाला हादरवून सोडणाऱ्या आणि गेल्या दोन दशकांपासून चर्चेत असलेल्या या प्रकरणाचा निकाल सीबीआय विशेष न्यायालयाने शुक्रवारी जाहीर केला. न्यायालयाने या खटल्याचा संपूर्ण पाया असलेल्या माफीच्या साक्षीदाराची साक्ष अविश्वसनीय, संशयास्पद आणि विसंगत असल्याचे नमूद करत सर्व आरोपींना संशयाचा फायदा देऊन निर्दोष मुक्त केले.
दरम्यान, खासदार ओमराजे निंबाळकर आणि निंबाळकर कुटुंबासाठी हा निकाल मोठा कायदेशीर धक्का मानला जात आहे. निकालापूर्वी माध्यमांशी बोलताना ओमराजे निंबाळकर यांनी, “आम्हाला न्याय मिळेल. गेली 20 वर्षे आम्ही या दिवसाची वाट पाहत आहोत,” असा विश्वास व्यक्त केला होता. मात्र, न्यायालयाचा निकाल त्यांच्या अपेक्षेच्या विरोधात गेला.
निकालानंतर प्रतिक्रिया देताना अर्चना पाटील म्हणाल्या, “सत्याचा विजय झाला. माझी मुलं लहान होती. सासूबाईंसह संपूर्ण कुटुंबाला मोठा मानसिक त्रास सहन करावा लागला. केवळ मोठ्याने आरोप केल्याने ते खरे ठरत नाहीत.”
त्या पुढे म्हणाल्या, “या आरोपांमुळे आमचे संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त झाले. राजकीय नुकसान झालेच, पण मानसिकदृष्ट्याही आम्ही खूप त्रास सहन केला. गेलेली वर्षे परत येणार नाहीत, मात्र आज समाधान वाटत आहे.”
मंगळसूत्र घेऊन गावोगावी फिरत होते
अर्चना पाटील म्हणाल्या, “मुलांना नववीत असताना तुरुंगात भेटायला जावे लागायचे. राणादादा आणि मी अधिक जोमाने मतदारसंघात फिरून लोकांची कामे करत राहिलो. प्रत्येक निवडणुकीत विरोधक हाच मुद्दा उपस्थित करत होते. पहिल्या निवडणुकीपासून मी हातात मंगळसूत्र घेऊन गावोगावी फिरत होते आणि लोकांना सांगत होते की आम्ही कोणाचा खून केलेला नाही.” हे सांगताना त्या भावूक झाल्या.
न्यायमूर्ती एस. आर. नावंदर यांच्या न्यायालयात सुनावणी
सीबीआय विशेष न्यायालयाचे न्यायमूर्ती एस. आर. नावंदर यांच्या कोर्ट क्रमांक 55 मध्ये या प्रकरणाची सुनावणी पार पडली. बिहारच्या तुरुंगात असलेल्या मुख्य शूटर पिंटू सिंग याला पोलिसांनी उशिरा न्यायालयात हजर केल्यामुळे काही काळ उत्सुकता निर्माण झाली होती. मात्र, त्याच्या उपस्थितीपूर्वीच कडेकोट पोलीस बंदोबस्तात न्यायालयाने निकालवाचनास सुरुवात केली.
माझी मुलं लहान होती, गावोगावी मंगळसूत्र हाती घेऊन फिरायचे; अर्चना पाटील भावूक
