यशश्री अपडेट्स | धाराशिव प्रतिनिधी
धाराशिवच्या राजकारणात सध्या विविध चर्चांना उधाण आले असून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर हे दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेल्या शिवसेना संसदीय समितीच्या बैठकीला उपस्थित राहणार नसल्याची माहिती समोर आली आहे. सध्या ओमराजे निंबाळकर हे पुण्यात असून त्यांनी बैठकीस गैरहजर राहण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले जात आहे.
या घडामोडीमुळे त्यांच्या संभाव्य राजकीय भूमिकेबाबत जिल्ह्यात पुन्हा चर्चांना वेग आला आहे. विशेषतः मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेशाच्या चर्चांना या निर्णयामुळे अधिक बळ मिळाल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे. मात्र याबाबत ओमराजे निंबाळकर यांनी अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका जाहीर केलेली नाही.
दरम्यान, कै. पवनराजे निंबाळकर आणि त्यांचे चालक समद काझी यांच्या दुहेरी हत्याकांड प्रकरणाचा निकाल 20 जून रोजी जाहीर होण्याची शक्यता आहे. या निकालानंतर धाराशिवच्या राजकारणात मोठ्या घडामोडी घडू शकतात, अशी चर्चा सुरू आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, निकालानंतर ओमराजे निंबाळकर आपली पुढील राजकीय भूमिका स्पष्ट करू शकतात.
या बहुचर्चित प्रकरणात माजी गृहमंत्री डॉ. पद्मसिंह पाटील यांच्यासह एकूण नऊ जण आरोपी असून सध्या ते जामिनावर आहेत. या हत्याकांडानंतर जिल्ह्यातील राजकीय समीकरणांमध्ये मोठे बदल झाले होते. त्यानंतर डॉ. पाटील परिवाराने राष्ट्रवादी काँग्रेसची साथ सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश केला होता.
आता 20 जूनच्या निकालाकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले असून निकालानंतर राजकीय आरोप-प्रत्यारोप, नवीन आघाड्या आणि पक्षांतराच्या घडामोडींना वेग येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

