मला डिस्चार्जनंतरही रुग्णालयात महिनाभर ठाण; महिला रुग्णाशी अश्लील चाळे, गुन्हा दाखल

यशश्री अपडेट्स | धाराशिव प्रतिनिधी
धाराशिव येथील जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचार घेत असलेल्या एका रुग्णाने डिस्चार्ज मिळाल्यानंतरही तब्बल महिनाभर रुग्णालयाचा कक्ष न सोडता अनधिकृतरीत्या वास्तव्य केल्याचा प्रकार समोर आला आहे. याच काळात संबंधित रुग्णाने एका महिला रुग्णासोबत अश्लील कृत्य केल्याचे सीसीटीव्ही फुटेजमध्ये आढळून आल्यानंतर त्याच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे समाजसेवा अधीक्षक सचिन राजेंद्र सातदिवे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून धाराशिव शहर पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम 132, 329(3), 296 आणि 351(2) अन्वये गुन्हा नोंद करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, धाराशिव शहरातील देशपांडे स्टँड परिसरातील रहिवासी दत्ता वसंत ताकपीरे याला 28 मार्च 2026 रोजी जिल्हा शासकीय वैद्यकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले होते. जवळपास दोन महिने उपचार घेतल्यानंतर प्रकृतीत सुधारणा झाल्याने 21 मे 2026 रोजी त्याला नियमानुसार डिस्चार्ज देण्यात आला. मात्र, डिस्चार्ज मिळाल्यानंतरही त्याने रुग्णालयाचा कक्ष सोडण्यास नकार देत तेथेच वास्तव्य सुरू ठेवले.
रुग्णालय प्रशासनाने वारंवार सूचना देऊनही त्याने डॉक्टर, परिचारिका आणि कर्मचाऱ्यांना धमक्या दिल्याचा आरोप आहे. “तुम्ही मला डिस्चार्ज कसा देऊ शकता, मला सुट्टी देऊन दाखवा मग बघतो,” अशा स्वरूपाची भाषा वापरत त्याने कर्मचाऱ्यांना दमदाटी केल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.
तसेच, संबंधित व्यक्तीने वॉर्डमध्ये विनापरवानगी मोबाईलद्वारे व्हिडिओ चित्रीकरण करून रुग्णालयाच्या कामकाजात अडथळा निर्माण केल्याचाही आरोप करण्यात आला आहे.
दरम्यान, वॉर्डमधील सुरक्षेसाठी बसविण्यात आलेल्या सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे फुटेज तपासण्यात आले असता, संबंधित रुग्ण हा शेजारच्या कॉटवर उपचार घेत असलेल्या ओळखीच्या महिला रुग्णासोबत अश्लील कृत्य करताना आढळून आला. हा प्रकार उघडकीस आल्यानंतर रुग्णालय प्रशासनाने तातडीने पोलिसांकडे तक्रार दाखल केली.
तक्रारीसोबत संबंधित सीसीटीव्ही फुटेजही पोलिसांकडे सुपूर्द करण्यात आले असून आरोपीचा शोध व पुढील तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *