मुंबईला चकरा, नेत्यांच्या गाठीभेटी; कला केंद्र पुन्हा सुरू करण्यासाठी लॉबिंग सुरू असल्याची चर्चा, पाठबळ कोण देणार?
यशश्री अपडेट्स | धाराशिव |
धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्रांच्या परवान्यांवर प्रशासनाने कठोर कारवाई केल्यानंतरही या प्रकरणाला पुन्हा एकदा वेगळे वळण मिळाले आहे. कालिका कला केंद्राच्या मालकीण निर्मला मोहन जाधव यांच्या विरोधात बीड जिल्ह्यातील एका २० वर्षीय महिलेने छत्रपती संभाजीनगर विभागाच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे टपालाद्वारे तक्रार अर्ज सादर केला आहे. जातीवाचक शिवीगाळ, अपमानास्पद वागणूक तसेच १५ लाख रुपयांबाबत बदनामीकारक पोस्ट प्रसारित केल्याचा गंभीर आरोप या तक्रारीत करण्यात आला आहे.
या तक्रारीमुळे जिल्ह्यातील बंद करण्यात आलेल्या कला केंद्रांचा विषय पुन्हा ऐरणीवर आला असून, प्रशासनाने केलेल्या कारवाईनंतरही काही ठिकाणी या प्रकारच्या व्यवसायाला छुप्या पद्धतीने पाठबळ मिळत आहे का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.
काम देण्याचे आमिष दाखवून बोलावल्याचा आरोप
तक्रारदार महिलेच्या म्हणण्यानुसार, कालिका कला केंद्रात काम देण्याचे आमिष दाखवून तिचा विश्वास संपादन करण्यात आला. त्यानंतर तिला बीड येथून उचल देऊन कालिका कला केंद्रात आणण्यात आले. मात्र, तेथे गेल्यानंतर आपल्याला जातीवाचक शिवीगाळ व अपमानास्पद वागणूक देण्यात आल्याचा आरोप महिलेने केला आहे.
याशिवाय, संबंधित महिलेकडून घेतलेली उचल परत घेऊन ती बदनामी करण्याच्या उद्देशाने तिच्या नावासह आणि फोटोसह सोशल मीडियावर पोस्ट प्रसारित करण्यात आल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे.
२४ ऑगस्ट रोजी संबंधित महिला १५ लाख रुपये घेऊन पळून गेली, अशा आशयाची बदनामीकारक पोस्ट प्रसारित करण्यात आल्याचे तक्रारदार महिलेचे म्हणणे आहे. या पोस्टमुळे आपली सामाजिक प्रतिष्ठा व मानसिक स्थितीवर गंभीर परिणाम झाल्याचा दावा तिने केला आहे.
या आरोपांची सत्यता तपासणे आणि संबंधितांवर कायदेशीर कारवाई करणे, अशी मागणी तक्रारदार महिलेने विशेष पोलीस महानिरीक्षकांकडे केली आहे.
सहा कला केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द

धाराशिव जिल्ह्यातील कला केंद्रांच्या संदर्भात यापूर्वीही प्रशासनाकडून मोठी कारवाई करण्यात आली आहे. पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांच्या भूमिकेनंतर जिल्हाधिकारी कीर्ती किरण पुजार आणि पोलीस अधीक्षक रितू खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली संबंधित ठिकाणी पाहणी, तपासणी व धाडी करण्यात आल्या होत्या.
या कारवाईदरम्यान नियमभंगाच्या विविध बाबी समोर आल्यानंतर सुनावणीची प्रक्रिया पार पडली. त्यानंतर जिल्ह्यातील तुळजाई, कालिका, महाकाली, पिंजरा, गौरी आणि साई या सहा कला केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. काही केंद्रांवर सीलची कारवाईही करण्यात आली.
प्रशासनाच्या या कारवाईनंतर संबंधित ठिकाणी सुरू असलेल्या कथित गैरप्रकारांना आळा बसेल, अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली होती.
मग पुन्हा कला केंद्र सुरू करण्यासाठी प्रयत्न कोणाचे?
कला केंद्रांचे परवाने रद्द झाल्यानंतर आणि काही केंद्रांवर सीलची कारवाई झाल्यानंतरही संबंधित व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी काही गावपुढारी व राजकीय व्यक्तींकडून प्रयत्न सुरू असल्याची चर्चा परिसरात आहे. यासाठी मुंबईला चकरा मारून विविध नेत्यांच्या गाठीभेटी घेतल्या जात असल्याचेही बोलले जात आहे.
कला केंद्र सुरू करण्यासाठी नेमके कोणाचे लॉबिंग सुरू आहे? या प्रयत्नांना कोणाचे राजकीय पाठबळ आहे? प्रशासनाच्या कारवाईनंतरही संबंधितांना पुन्हा व्यवसाय सुरू करण्यासाठी मदत कोण करत आहे? असे प्रश्न आता उपस्थित होत आहेत.
मात्र, या राजकीय लॉबिंगच्या चर्चेदरम्यानच कालिका कला केंद्राशी संबंधित महिलेची तक्रार समोर आल्याने प्रकरणाचे गांभीर्य वाढले आहे.
बंदीनंतरही छुप्या पद्धतीने प्रकार सुरू असल्याची चर्चा
जिल्ह्यातील कला केंद्रांवर कारवाई झाल्यानंतर अनेक ठिकाणी संबंधित व्यवसाय बंद झाल्याने स्थानिक नागरिक आणि महिलांमध्ये समाधानाचे वातावरण असल्याचे सांगितले जात आहे. मात्र, काही ठिकाणी बंदी असतानाही छुप्या पद्धतीने ‘छमछम’ सुरू असल्याची तसेच काही लॉजमध्ये खासगी बैठका होत असल्याची चर्चा आहे.
या चर्चांमध्ये कितपत तथ्य आहे, याची स्वतंत्र चौकशी होणे गरजेचे आहे. प्रशासनाने सील केलेल्या कला केंद्रांची प्रत्यक्ष सद्यस्थिती तपासून तेथे नियमबाह्य पद्धतीने कोणतेही काम सुरू नाही ना, याची खात्री करण्याची मागणीही नागरिकांकडून होऊ शकते.
यापूर्वीही गंभीर आरोप आणि गुन्ह्यांच्या घटना
धाराशिव जिल्ह्यातील काही कला केंद्रांशी संबंधित प्रकरणांमध्ये यापूर्वी महिलांचे शारीरिक व लैंगिक शोषण, जबरदस्तीने वेश्या व्यवसाय करण्यास भाग पाडणे, तसेच धर्मांतरासाठी दबाव आणल्याचे आरोप झाले आहेत. अशा काही प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल झाल्याची माहितीही समोर आली होती.
काही ठिकाणी जीवघेणे हल्ले आणि गोळीबाराच्या घटनांमुळेही कला केंद्रांचा विषय यापूर्वी चर्चेत आला आहे. त्यामुळे कला केंद्रांच्या नावाखाली महिलांचे शोषण किंवा बेकायदेशीर कृत्ये होत असतील तर त्यांची सखोल चौकशी करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
प्रशासनाच्या कारवाईनंतर पुढील भूमिका काय?
एकीकडे प्रशासनाने नियमभंगाच्या प्रकरणांत कठोर भूमिका घेत सहा कला केंद्रांचे परवाने कायमस्वरूपी रद्द केले आहेत, तर दुसरीकडे संबंधित व्यवसाय पुन्हा सुरू करण्यासाठी राजकीय पातळीवर प्रयत्न होत असल्याची चर्चा आहे. त्यातच कालिका कला केंद्राच्या मालकीणविरोधात महिलेने केलेली तक्रार समोर आल्याने प्रशासन आणि पोलिसांसमोर नव्या चौकशीचा मुद्दा निर्माण झाला आहे.
तक्रारीतील आरोपांची चौकशी करून सत्य परिस्थिती समोर आणणे, सोशल मीडियावर प्रसारित झालेल्या पोस्टची सत्यता तपासणे, संबंधित पोस्ट कोणी तयार केली व प्रसारित केली याचा शोध घेणे आणि नियमबाह्य पद्धतीने कोणतेही कला केंद्र किंवा तत्सम व्यवसाय सुरू असल्यास त्यांच्यावर कारवाई करणे, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
दरम्यान, तक्रारीतील आरोप सिद्ध झालेले नसून, संबंधित प्रकरणाची अधिकृत चौकशी झाल्यानंतरच वस्तुस्थिती स्पष्ट होणार आहे. संबंधित व्यक्तींची बाजू आणि पोलिस तपासातील निष्कर्षही महत्त्वाचे ठरणार आहेत.
