कळंब ड्रग्ज तस्करी प्रकरणात नगरसेवक मोसीन मिर्झाला २४ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी; आरोपींची संख्या सहावर

यशश्री अपडेट्स | धाराशिव : कळंब शहरातील ड्रग्ज तस्करी प्रकरणाने आता गंभीर वळण घेतले असून, या प्रकरणात नगरसेवक मोसीन सलीम मिर्झा याला पोलिसांनी आरोपी करत अटक केली आहे. न्यायालयाने मिर्झाला २४ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे. मिर्झा याचे नाव यापूर्वी परभणीतील ड्रग्जसंबंधित गुन्ह्यातही आरोपी म्हणून समोर आले असल्याने या प्रकरणाच्या तपासाकडे जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

कळंब येथील ड्रग्ज तस्करी प्रकरणात सुरुवातीला दोन आरोपींना अटक करण्यात आली होती. मात्र, तपास जसजसा पुढे जात आहे, तसतशी या प्रकरणातील आरोपींची संख्या वाढत असून आता सहा आरोपी पोलिसांच्या रडारवर आले आहेत. पोलिसांकडून आरोपींचे परस्पर संबंध, ड्रग्जचा पुरवठा कुठून होत होता, आर्थिक व्यवहार कोणामार्फत केले जात होते आणि या संपूर्ण साखळीत आणखी कोणाचा सहभाग आहे, याचा तपास सुरू आहे.

११.२१ ग्रॅम एमडी ड्रग्ज जप्त

धाराशिव पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेने ४ ऑगस्ट रोजी कळंब परिसरात कारवाई करत दोन आरोपींना अटक केली होती. या कारवाईत ११.२१ ग्रॅम वजनाच्या २९ पुड्या एमडी ड्रग्ज जप्त करण्यात आल्या. पोलिसांनी आरोपींना रंगेहात पकडल्याचे सांगण्यात आले आहे. जप्त केलेल्या ड्रग्जची किंमत सुमारे ५५ हजार रुपये, तर दुचाकीसह एकूण जप्त मुद्देमालाची किंमत सुमारे १ लाख १० हजार रुपये असल्याची माहिती आहे.

या कारवाईनंतर पोलिसांनी तपासाची दिशा केवळ ड्रग्ज बाळगणाऱ्या व्यक्तींपुरती मर्यादित न ठेवता त्यामागील पुरवठादार, तस्कर, विक्रेते आणि आर्थिक व्यवहारांची साखळी शोधण्यावर भर दिला आहे.

व्यावसायिक प्रमाणातील ड्रग्ज असल्याने कायदेशीर अडचणी वाढणार

या प्रकरणात जप्त करण्यात आलेले एमडी ड्रग्जचे प्रमाण व्यावसायिक (Commercial) प्रमाणाच्या निकषात येत असल्याचे पोलिस तपासातून समोर आले आहे. त्यामुळे आरोपींवर लागू होणाऱ्या कायदेशीर तरतुदी गंभीर स्वरूपाच्या असून, जामिनाच्या प्रक्रियेतही आरोपींसमोर अडचणी निर्माण होण्याची शक्यता आहे.

पोलिसांकडून आरोपींच्या बँक खात्यांची माहिती, आर्थिक व्यवहार, कॉल डिटेल रेकॉर्ड (CDR), मोबाईलमधील माहिती आणि इतर उपलब्ध पुरावे तपासले जात आहेत. या तपासातून ड्रग्ज तस्करीची संपूर्ण साखळी उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

तीन आरोपी जेलमध्ये; इतर आरोपी पोलिस कोठडीत

या प्रकरणात निखिल युवराज जाधव, अरविंद दादाराव कांबळे आणि लखन गायकवाड हे तीन आरोपी सध्या न्यायालयीन कोठडीत असल्याची माहिती आहे. अक्षय रिटे याला २० ऑगस्टपर्यंत, तर मावळ येथील सुशांत सुतार याला २४ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी देण्यात आली आहे. आता नगरसेवक मोसीन सलीम मिर्झा यालाही २४ ऑगस्टपर्यंत पोलिस कोठडी मिळाल्याने तपासाला आणखी वेग येण्याची शक्यता आहे.

पोलिसांकडून केवळ तस्करी करणाऱ्यांचाच नव्हे, तर ड्रग्जची विक्री, पुरवठा आणि सेवन करणाऱ्या व्यक्तींचाही शोध घेतला जात आहे. त्यामुळे तपासाची व्याप्ती आणखी वाढण्याची शक्यता आहे.

ड्रग्जविरोधी कारवाईला गती

ड्रग्ज हे तरुण पिढीच्या भवितव्याला उद्ध्वस्त करणारे गंभीर सामाजिक संकट असल्याने त्याविरोधात कठोर कारवाई करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे. राजकीय पदावर असलेल्या व्यक्तींचीही समाजाप्रती नैतिक जबाबदारी असून, कोणत्याही व्यक्तीचा किंवा राजकीय पक्षाचा दबाव अथवा वरदहस्त असला तरी गुन्हेगारी प्रवृत्तींवर कठोर कारवाई झाली पाहिजे, अशी भूमिका व्यक्त होत आहे.

पालकमंत्री प्रतापराव सरनाईक यांनी यापूर्वी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तसेच सरकार पोलिसांच्या पाठीशी असल्याचे सांगितले होते. त्यानंतर जिल्ह्यातील ड्रग्ज प्रकरणांच्या तपासाला गती मिळाल्याचे चित्र आहे.

वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली तपास

धाराशिव जिल्हा पोलिस अधीक्षक रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली या प्रकरणाचा तपास सुरू आहे. पोलिस निरीक्षक शकील शेख तपासाची धुरा सांभाळत आहेत. तसेच स्थानिक गुन्हे शाखेच्या कारवाईत पोलिस अधीक्षक रितु खोखर यांच्या मार्गदर्शनाखाली अपर पोलिस अधीक्षक सचिन पांडकर, उपविभागीय पोलिस अधिकारी संजय पवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक विनोद इज्जपवार, सपोनि खटके, सपोनि मगर तसेच कळंब पोलिस ठाणे आणि स्थानिक गुन्हे शाखेतील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सहभाग घेतला.

या कारवाईत पोहेकॉ राठोड, पोहेकॉ जानराव, पोहेकॉ गादेकर, पोहेकॉ जाधवर, पोहेकॉ चौरे, पोना जाधवर, पोना ढगारे, पोअं मुंगळे, पोहेकॉ शेख, पोहेकॉ माळवे, पोअं बोईनवाड, पोहेकॉ आरब, चापोहेकॉ माने यांच्यासह पोलिस पथकाने कामगिरी बजावली.

तपासातून आणखी धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता

सध्या पोलिसांकडून आरोपींच्या आर्थिक व्यवहारांसह मोबाईल कॉल रेकॉर्ड, संपर्कातील व्यक्ती आणि ड्रग्जच्या पुरवठ्याचे मार्ग तपासले जात आहेत. त्यामुळे या प्रकरणामागे आणखी कोण व्यक्ती किंवा टोळी कार्यरत आहे का, याचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

कळंबमधील या कारवाईमुळे जिल्ह्यातील ड्रग्ज तस्करीविरोधातील पोलिस कारवाईला आणखी बळ मिळाले आहे. तरुणांमध्ये वाढणाऱ्या अमली पदार्थांच्या वापराला आळा घालण्यासाठी तस्करांसह विक्रेते, पुरवठादार आणि संबंधित आर्थिक साखळीवर कठोर कारवाई करण्याचे आव्हान पोलिसांसमोर आहे. आगामी काळात तपासातून कोणती नवीन माहिती समोर येते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!