यशश्री अपडेट्स|धाराशिव, दि. १९ : ग्रामीण भागातील महिलांना स्वयंरोजगाराच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी जिल्हा परिषद धाराशिवने अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. जिल्ह्यातील प्रत्येक गावातील ४ ते ५ पात्र महिलांना उद्योग उभारण्यासाठी मार्गदर्शन व सहकार्य करण्यात येणार असून, या उपक्रमाच्या माध्यमातून ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणावर रोजगारनिर्मितीला चालना मिळण्याची अपेक्षा आहे.
या उपक्रमांतर्गत महिलांना मुख्यमंत्री स्वयंरोजगार निर्मिती कार्यक्रम (CMEGP) तसेच प्रधानमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम (PMEGP) यांसारख्या स्वयंरोजगाराच्या योजनांची माहिती देऊन त्यांना उद्योग उभारणीसाठी प्रोत्साहित केले जाणार आहे. संबंधित योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रे, पात्रता, कर्जप्रक्रिया, प्रकल्प अहवाल आणि प्रस्ताव सादरीकरणाबाबत महिलांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
या संपूर्ण प्रक्रियेत उमेद अभियानांतर्गत कार्यरत समुदाय संसाधन व्यक्तींची (CRP) भूमिका महत्त्वाची ठरणार आहे. गावातील पात्र महिलांची ओळख करून त्यांची निवड करणे, त्यांना उपलब्ध शासकीय योजनांची माहिती देणे, उद्योगाची संकल्पना निश्चित करण्यास मदत करणे तसेच प्रस्ताव तयार करून तो संबंधित यंत्रणेकडे सादर करण्यासाठी आवश्यक मार्गदर्शन करणे, अशी जबाबदारी समुदाय संसाधन व्यक्तींवर सोपविण्यात येणार आहे.
समुदाय संसाधन व्यक्तींना या कामासाठी प्रोत्साहन मिळावे आणि अधिकाधिक पात्र महिलांना स्वयंरोजगाराच्या योजनांशी जोडता यावे, यासाठी जिल्हा परिषदेमार्फत प्रत्येक प्रस्तावामागे १,००० रुपयांचे प्रोत्साहनपर मानधन देण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे. त्यामुळे गावागावातील महिलांपर्यंत योजनांचा प्रभावीपणे प्रसार होण्यास मदत होणार आहे.
या संदर्भातील निर्णय जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत घेण्यात येणार असल्याची घोषणा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा सौ. अर्चनाताई पाटील यांनी केली. यावेळी जिल्ह्यातील समुदाय संसाधन व्यक्ती मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
ग्रामीण भागातील अनेक महिलांकडे उद्योग करण्याची क्षमता व इच्छाशक्ती असली, तरी शासकीय योजनांची माहिती, कर्जप्रक्रिया आणि प्रस्ताव तयार करण्याबाबत मार्गदर्शनाचा अभाव असल्याने त्यांना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. ही अडचण दूर करण्यासाठी समुदाय संसाधन व्यक्तींच्या माध्यमातून महिलांना थेट मदत उपलब्ध करून देण्याचा जिल्हा परिषदेचा हा उपक्रम महत्त्वपूर्ण मानला जात आहे.
या उपक्रमामुळे महिलांना केवळ शासकीय योजनांचा लाभ मिळण्यास मदत होणार नाही, तर लघुउद्योग, सेवा व्यवसाय आणि विविध स्वयंरोजगाराच्या माध्यमातून कुटुंबाच्या उत्पन्नात वाढ करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. त्याचबरोबर गावपातळीवर नव्या उद्योगांची निर्मिती होऊन स्थानिक पातळीवर रोजगाराच्या संधीही निर्माण होण्याची शक्यता आहे.
महिलांचे आर्थिक सक्षमीकरण, ग्रामीण अर्थव्यवस्थेला बळकटी आणि गावपातळीवर उद्योगनिर्मिती यांना एकाच वेळी चालना देणारा हा उपक्रम धाराशिव जिल्ह्यातील ग्रामीण विकासाच्या दृष्टीने महत्त्वाचा टप्पा ठरण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
