कर्जबाजारीपणा व नापिकीला कंटाळून २५ वर्षीय तरुणाची आत्महत्याः डोकेवाडीतील घटना

यशश्री अपडेट्स-भूम

तालुक्यातील डोकेवाडी येथे २५ वर्षीय तरुणाने आत्महत्या केल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. पद्माकर अशोक आहेर (वय २५) असे मृत तरुणाचे नाव असून तो शेती करत होता. सतत नापिकी, शेतीतील उत्पन्नात घट तसेच वाढलेल्या कर्जबाजारीपणामुळे तो मानसिक तणावाखाली असल्याचे सांगण्यात येत आहे. शुक्रवारी (दि.२२) दुपारी ही घटना घडली. तरुणाने आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. घटनेची माहिती मिळताच नातेवाईकांनी त्याला तातडीने ईट येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले, मात्र तेथील डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. घटनास्थळी

पोलिसांना एक चिठ्ठी आढळून आली असून, त्यामध्ये कर्जबाजारीपणा, नापिकी तसेच मराठा आरक्षणाच्या कारणांचा उल्लेख असल्याचे समजते. या प्रकरणी वाशी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. मृत तरुणाच्या पश्चात आई-वडील, पत्नी आणि एक लहान मुलगा असा परिवार आहे. या घटनेनंतर डोकेवाडी व परिसरात शोककळा पसरली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *