रवींद्र चव्हाणांच्या कार्यक्रमातील उपस्थिती चर्चेत; सुरेश कांबळेंचा भाजप प्रवेशावर खुलासा

यशश्री अपडेट्स | भूम (प्रतिनिधी):

भूम शहरात भाजप प्रदेशाध्यक्ष आमदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थितीत झालेल्या कार्यक्रमामुळे स्थानिक राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. विशेषतः जय हनुमान ग्रुपचे अध्यक्ष सुरेश भाऊ कांबळे यांची या कार्यक्रमातील उपस्थिती चर्चेचा विषय ठरली. या पार्श्वभूमीवर कांबळे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट करत सध्या तरी भाजपमध्ये जाण्याचा कोणताही विचार नसल्याचे स्पष्ट केले.

काल भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण हे भूम तालुक्यातील वंजरवाडी येथे एका घरगुती कार्यक्रमासाठी आले होते. त्यांच्या भूम शहरातील आगमनाच्या पार्श्वभूमीवर गोलाई चौक येथे अक्की बर्वे व सुरेश कांबळे मित्रपरिवाराच्या वतीने त्यांचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. त्यानंतर श्री एस अकॅडमी येथेही रवींद्र चव्हाण यांचा सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाला जय हनुमान ग्रुपचे अध्यक्ष सुरेश भाऊ कांबळे आवर्जून उपस्थित राहिल्याने त्यांच्या राजकीय भूमिकेबाबत विविध तर्क-वितर्क सुरू झाले. आगामी काळात कांबळे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा स्थानिक राजकीय वर्तुळात रंगू लागली. या चर्चांना पूर्णविराम देण्यासाठी कांबळे यांनी पत्रकार परिषद घेत आपली भूमिका स्पष्ट केली.

यावेळी बोलताना सुरेश भाऊ कांबळे म्हणाले, “मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हा परिषद निवडणूक लढवली आहे. मी आहे त्या ठिकाणी सुखी आहे. सध्या माझा भाजपमध्ये जाण्याचा कोणताही विचार नाही.” कालचा कार्यक्रम हा राजकीय नसून आपले भाचे अक्की बर्वे यांच्या घराच्या वास्तूशांतीचा कार्यक्रम होता. या कार्यक्रमासाठी भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण आले होते. त्यांचा आदर आणि सन्मान म्हणून त्यांचे स्वागत व सत्कार करण्यात आला. त्यामुळे या उपस्थितीचा राजकीय अर्थ काढणे योग्य नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

मात्र, रवींद्र चव्हाण यांच्या कार्यपद्धतीचे आणि कार्यकर्त्यांवरील प्रेमाचे त्यांनी कौतुक केले. “रवींद्र चव्हाण यांचे कार्यकर्त्यांवरील प्रेम पाहता भविष्यात संधी मिळाली तर त्यांच्यासोबत काम करण्याची इच्छा आहे,” असेही कांबळे यांनी सांगितले. त्यामुळे सध्याची भूमिका स्पष्ट ठेवतानाच भविष्यातील राजकीय शक्यतांचे दरवाजे पूर्णपणे बंद केले नसल्याचे त्यांच्या वक्तव्यातून दिसून आले.

सुरेश कांबळे यांनी आपण सध्या जनतेची कामे करण्याला प्राधान्य देत असल्याचे सांगितले. “मी सध्या पूर्ण वेळ जनसेवेसाठी देत आहे. जनतेच्या अडचणी सोडविण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे,” असे त्यांनी नमूद केले. राजकारणात अडचणीच्या काळात ज्यांनी साथ दिली, त्यांचे ऋण आपण कधीही विसरणार नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

यावेळी कांबळे यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजितदादा पवार यांच्याबाबतही भावनिक विधान केले. “माझ्या अडचणीच्या काळात ज्यांनी मदत केली, त्यांना मी कधीही विसरणार नाही. अजितदादा असते तर परिस्थिती वेगळी दिसली असती,” असे ते म्हणाले. त्यांच्या या वक्तव्यामुळेही राजकीय चर्चेला वेगळे वळण मिळाले आहे.

दरम्यान, भूम शहराच्या विकासाशी संबंधित महत्त्वाच्या प्रश्नांकडेही सुरेश कांबळे यांनी लक्ष वेधले. भूम शहरालगत असलेल्या एमआयडीसीच्या प्रश्नासंदर्भात रवींद्र चव्हाण यांच्या माध्यमातून सकारात्मक प्रयत्न व्हावेत, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली. भूम परिसरात औद्योगिक विकासाला चालना मिळाल्यास स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होऊ शकतात, त्यामुळे एमआयडीसीच्या प्रश्नाला गती मिळणे आवश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

एकीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचा भूम दौरा आणि दुसरीकडे सुरेश कांबळे यांची त्यांच्यासोबतची उपस्थिती यामुळे राजकीय चर्चांना उधाण आले होते. मात्र, पत्रकार परिषदेत कांबळे यांनी सध्याच्या राजकीय भूमिकेबाबत स्पष्ट शब्दांत स्पष्टीकरण दिल्याने या चर्चांना तूर्तास पूर्णविराम मिळाला आहे.

कार्यक्रमाला जय हनुमान ग्रुपचे पदाधिकारी, अक्की बर्वे यांचे मित्रपरिवार, स्थानिक नागरिक तसेच विविध क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते. दरम्यान, सुरेश कांबळे यांच्या “मी आहे त्या ठिकाणी सुखी आहे” या वक्तव्यामुळे भूमच्या राजकीय वर्तुळात त्यांच्या पुढील राजकीय वाटचालीबाबत उत्सुकता कायम राहिली आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!