यशश्री अपडेट्स | परंडा
परंडा : परंडा–सोनारी मार्गावरील बावची चौकात शुक्रवारी दुपारी सुमारे २.३० वाजण्याच्या सुमारास काही व्यक्तींमध्ये अचानक झालेल्या तुफान हाणामारीमुळे परिसरात एकच खळबळ उडाली. भररस्त्यात झालेल्या या धुमश्चक्रीमध्ये दगड आणि लाकडांचा वापर करून एकमेकांवर हल्ला करण्यात आला. तब्बल २० ते २५ मिनिटे सुरू असलेल्या या प्रकारामुळे वाहतुकीवर परिणाम झाला असून परिसरात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.
प्रत्यक्षदर्शी नागरिकांनी दिलेल्या माहितीनुसार, बावची चौकात नेहमीप्रमाणे मोठी वर्दळ असताना अचानक काही जणांमध्ये वाद सुरू झाला. सुरुवातीला शाब्दिक बाचाबाची झाल्यानंतर हा वाद काही क्षणांतच हिंसक स्वरूप धारण करत भररस्त्यातच हाणामारी सुरू झाली. काही जण दगड उचलून मारत होते, तर काहींनी लाकडांच्या साहाय्याने एकमेकांवर हल्ला केल्याचे नागरिकांनी सांगितले.
या घटनेचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर व्हायरल झाले असून त्यामध्ये भररस्त्यात सुरू असलेली मारामारी, धावाधाव आणि नागरिकांची घाबरलेली अवस्था स्पष्टपणे दिसून येत आहे. व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर या घटनेची जिल्हाभर चर्चा सुरू झाली आहे.
पोलिसांचा तातडीने बंदोबस्त
घटनेची माहिती मिळताच परंडा पोलिस तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन उपविभागीय पोलीस अधिकारी अनिल चोरमले आणि सहाय्यक पोलीस निरीक्षक प्रवीण सिरसाट यांनी शहरातील विविध संवेदनशील भागांमध्ये अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात केला. पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणत संबंधित व्यक्तींना पांगवले.
कारण अद्याप अस्पष्ट
हे भांडण नेमके कोणत्या कारणातून झाले, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. वैयक्तिक वाद, जुन्या भांडणाची पार्श्वभूमी की इतर कोणते कारण याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. घटनेतील संबंधित व्यक्तींची ओळख पटविण्याचे काम सुरू असून सायंकाळच्या सुमारास काहीजण तक्रार नोंदविण्यासाठी परंडा पोलिस ठाण्यात दाखल झाले होते.
टेलर दुकानाच्या काचा फोडल्या
दरम्यान, शहरात एकीकडे बावची चौकात राडा सुरू असतानाच दुसरीकडे कल्याणसागर चौकातील एका टेलरच्या दुकानाच्या काचा फोडून नुकसान केल्याची घटना घडली. या प्रकारामुळे शहरातील तणाव अधिक वाढल्याची चर्चा नागरिकांमध्ये होती. दुकानाचे नेमके किती नुकसान झाले याचा पंचनामा करण्यात येत असून हा प्रकार मुख्य भांडणाशी संबंधित आहे की स्वतंत्र घटना, याचाही तपास पोलिस करत आहेत.
नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
वर्दळीच्या ठिकाणी भरदिवसा अशा प्रकारे उघडपणे हाणामारी झाल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. व्यापाऱ्यांनी तसेच स्थानिक नागरिकांनी अशा घटनांवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे. शहरातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी पोलिसांनी गस्त वाढविली असून परिस्थिती सध्या नियंत्रणात असल्याची माहिती पोलिसांकडून देण्यात आली आहे.
