धाराशिवमध्ये वाढत्या जातीय अत्याचारांविरोधात वंचित बहुजन आघाडी आक्रमक

यशश्री अपडेट्स -धाराशिव :

(राज्य प्रवक्ते मा. अरुण आबा जाधव यांच्या नेतृत्वाखाली पोलिस अधीक्षक मा. रितु खोकर यांची भेट)

धाराशिव जिल्ह्यात दिवसेंदिवस वाढत असलेल्या जातीय अत्याचारांच्या घटनांबाबत तीव्र चिंता व्यक्त करत वंचित बहुजन आघाडीच्या शिष्टमंडळाने पोलिस अधीक्षक मा. रितु खोकर यांची भेट घेऊन अन्यायग्रस्तांना तातडीने न्याय मिळावा तसेच दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी ठाम भूमिका मांडली.
वंचित बहुजन आघाडीचे राज्य प्रवक्ते मा. अरुण आबा जाधव यांच्या नेतृत्वाखाली हे शिष्टमंडळ पोलिस अधीक्षक कार्यालयात दाखल झाले. यावेळी जिल्ह्यात घडत असलेल्या विविध अत्याचारांच्या घटनांची माहिती देण्यात आली. विशेषतः दलित, वंचित आणि दुर्बल घटकांवर होणारे अन्याय, सामाजिक तणाव आणि कायदा-सुव्यवस्थेच्या प्रश्नांबाबत गंभीर चर्चा करण्यात आली.
शिष्टमंडळाने पोलिस प्रशासनाकडे मागणी केली की, जातीय अत्याचाराच्या प्रकरणांमध्ये निष्पक्ष चौकशी करून दोषींवर तातडीने कठोर कारवाई करण्यात यावी. तसेच पीडित कुटुंबांना संरक्षण, न्याय आणि शासकीय मदत त्वरित उपलब्ध करून द्यावी. समाजात भीतीचे वातावरण निर्माण होऊ नये यासाठी संवेदनशील भागांमध्ये पोलिस गस्त वाढवून कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवावी, अशीही मागणी करण्यात आली.
यावेळी पोलिस अधीक्षक मा. रितु खोकर यांनी शिष्टमंडळाच्या मागण्या गांभीर्याने ऐकून घेतल्या असून कायद्याच्या चौकटीत योग्य ती कारवाई करण्यात येईल, असे आश्वासन दिल्याची माहिती देण्यात आली.
या शिष्टमंडळात सोलापूर जिल्हाध्यक्ष मा. चंद्रशेखर मडिखांबे, धाराशिव जिल्हाध्यक्ष धनंजय सोनटक्के, जिल्हा संघटक विकास बनसोडे, सह प्रसिद्धी प्रमुख कुंदन वाघमारे, महिला जिल्हाध्यक्ष अनुराधा ताई लोखंडे, कामगार आघाडीचे अध्यक्ष सुधीर वाघमारे यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
वंचित बहुजन आघाडीने सामाजिक न्याय, संविधानिक हक्क आणि सर्वसामान्य नागरिकांच्या सुरक्षेसाठी पुढेही संघर्ष सुरू ठेवणार असल्याची भूमिका यावेळी व्यक्त करण्यात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *