धाराशिव येथे ‘संडे ऑन सायकल’ अभियानांतर्गत ७ जून रोजी भव्य सायकल रॅली

यशश्री अपडेट्स-धाराशिव(प्रतिनिधी ):

दि. ४ : जागतिक सायकल दिवस २०२६ निमित्त जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, धाराशिव, खो-खो खेलो इंडिया सेंटर आणि क्रीडा भारती यांच्या संयुक्त विद्यमाने ‘संडे ऑन सायकल’ या अभियानांतर्गत रविवारी, ७ जून २०२६ रोजी सकाळी ७ वाजता भव्य सायकल रॅलीचे आयोजन करण्यात आले आहे.
या उपक्रमाचा उद्देश नागरिकांमध्ये सायकलिंगबाबत जागरूकता निर्माण करणे, नियमित व्यायामाला प्रोत्साहन देणे तसेच पर्यावरणपूरक जीवनशैलीचा संदेश देणे हा आहे. या रॅलीमध्ये खेलो इंडिया सेंटर, क्रीडा भारती, श्रीपतराव भोसले हायस्कूल, छत्रपती शिवाजी विद्यालय येथील खेळाडू, विद्यार्थी तसेच विविध क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी सहभागी होणार आहेत.
जिल्हा क्रीडा अधिकारी श्रीकांत हरनाळे यांनी धाराशिव शहरातील युवक-युवती, खेळाडू आणि नागरिकांनी या रॅलीत मोठ्या संख्येने सहभागी होऊन अभियानाला यशस्वी करावे, असे आवाहन केले आहे.
रॅलीची सुरुवात जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (DIET) येथून होणार असून गरड हॉस्पिटलजवळून उजवीकडे वळण घेऊन देशमुख हॉस्पिटल, एचडीएफसी बँक, महात्मा फुले चौक मार्गे श्री तुळजाभवानी जिल्हा स्टेडियम येथे रॅलीचा समारोप होणार आहे.
‘संडे ऑन सायकल’ अभियानाच्या माध्यमातून आरोग्यदायी जीवनशैली, शारीरिक तंदुरुस्ती आणि पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यात येणार असून या उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *