यशश्री अपडेट्स-धाराशिव | प्रतिनिधी
धाराशिव-लातूर-बीड स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विधान परिषद निवडणुकीतील बंडखोरी अखेर शमली असून निवडणुकीचे चित्र आता पूर्णपणे स्पष्ट झाले आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अंतिम दिवशी सर्व अपक्ष उमेदवारांनी माघार घेतल्याने निवडणूक आता महायुती विरुद्ध महाविकास आघाडी अशी थेट रंगणार आहे.
निवडणुकीच्या शेवटच्या टप्प्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडल्या. ठाकरे गटाशी संबंधित अपक्ष उमेदवारांसह इतर सर्व अपक्षांनीही आपले उमेदवारी अर्ज मागे घेतले. त्यामुळे आता या निवडणुकीत केवळ दोन प्रमुख उमेदवार मैदानात उरले आहेत.
महायुतीकडून बसवराज पाटील तर महाविकास आघाडीकडून महेश देशमुख हे उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात कायम आहेत. त्यामुळे या मतदारसंघात आता थेट भाजप आणि काँग्रेस समर्थित आघाड्यांमध्ये प्रतिष्ठेची लढत होणार आहे.
उमेदवारी अर्ज मागे घेतलेले उमेदवार (दि. ४ जून २०२६)
महालिंगे मिलिंद गणपती (चाकूर) – अपक्ष
अर्चना विनोद गंगणे (तुळजापूर) – अपक्ष
शरद रामभाऊ यादव (माजलगाव) – अपक्ष
अहमदखान सय्यद नूर राज सय्यद (माजलगाव) – अपक्ष
संजय पांडुरंगजी मुंदडा (कळंब) – अपक्ष
सचिन भारतराव पवार (धाराशिव) – अपक्ष
सहालबिन आमेर चाऊस (माजलगाव) – अपक्ष
अपक्ष उमेदवारांच्या माघारीमुळे मतविभाजनाची शक्यता कमी झाली असून आता सर्वांचे लक्ष महायुतीचे उमेदवार बसवराज पाटील आणि महाविकास आघाडीचे उमेदवार महेश देशमुख यांच्यातील थेट लढतीकडे लागले आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सदस्यांच्या मतांवर आधारित होणाऱ्या या निवडणुकीत दोन्ही आघाड्यांनी विजयासाठी जोरदार मोर्चेबांधणी सुरू केली आहे.
धाराशिव-लातूर-बीड विधान परिषद निवडणुकीत थेट भाजप विरुद्ध काँग्रेस लढत; सर्व अपक्ष उमेदवारांची माघार
