यशश्री अपडेट्स-धाराशिव | प्रतिनिधी
उस्मानाबाद-लातूर-बीड विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धाराशिवमधील उद्धवसेनेत अंतर्गत मतभेद उघड होत असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगू लागली आहे. नगरसेवक सचिन पवार यांनी दाखल केलेला अपक्ष उमेदवारी अर्ज मागे घेताना महाविकास आघाडीच्या नेत्यांऐवजी भाजप पदाधिकाऱ्यांसोबत उपस्थित राहिल्याने अनेक तर्क-वितर्कांना उधाण आले आहे.
विधान परिषद निवडणुकीत महाविकास आघाडी एकसंघपणे लढणार असल्याचे पक्षाच्या वरिष्ठ नेत्यांकडून वारंवार सांगितले जात असताना, उद्धवसेनेच्या चिन्हावर निवडून आलेले कळंबचे नगरसेवक संजय मुंदडा आणि धाराशिवचे नगरसेवक सचिन पवार यांनी अपक्ष अर्ज दाखल केले होते. खासदार ओमराजे निंबाळकर यांनी दोघांनाही अर्ज मागे घेण्यासाठी प्रयत्न केले.
यामध्ये संजय मुंदडा यांनी खासदारांसोबत येऊन अर्ज मागे घेतला. मात्र, सचिन पवार यांनी अर्ज माघारी घेताना भाजप पदाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत प्रक्रिया पूर्ण केली. विशेष म्हणजे, त्यांच्यासोबत उद्धवसेनेचे आणखी तीन नगरसेवकही दिसून आले. त्यानंतर भाजपचे जिल्हाध्यक्ष दत्ता कुलकर्णी आणि प्रवक्ते अॅड. नितीन भोसले यांच्यासमवेत छायाचित्रे काढल्याने राजकीय चर्चांना आणखी खतपाणी मिळाले आहे.
धाराशिव नगरपालिकेत उद्धवसेनेचे गटनेते प्रदीप मुंडे आहेत, तर पक्षाच्या ‘व्हीप’चे अधिकार सचिन पवार यांच्याकडे आहेत. त्यामुळे आगामी काळात पक्षविरोधी भूमिका किंवा मतदानाच्या संदर्भात काही वाद निर्माण झाल्यास पक्षाची भूमिका काय राहणार, याकडे राजकीय निरीक्षकांचे लक्ष लागले आहे.
या घडामोडींमुळे धाराशिवमधील उद्धवसेनेत दोन स्वतंत्र गट तयार होत असल्याच्या चर्चांना वेग आला असून विधान परिषद निवडणुकीदरम्यान या घडामोडींचे राजकीय परिणाम काय होतात, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

