‘कपडे’ बोलले आणि ‘गुन्हेगार’ सापडला; बार्शी पोलिसांची कौशल्यपूर्ण कामगिरी

यशश्री अपडेट्स-बार्शी | प्रतिनिधी
बार्शी-परंडा महामार्गावरील हिंगणगाव पाटीजवळ १ जून रोजी रात्री घडलेल्या अपघातातील अज्ञात मृतदेहाची ओळख पटवून अपघातास जबाबदार असलेल्या दुचाकीस्वाराचा शोध घेण्यात बार्शी तालुका पोलिसांना यश आले आहे. मृत व्यक्तीजवळ कोणतेही ओळखपत्र नसतानाही केवळ अंगावरील कपड्यांच्या वर्णनाच्या आधारे पोलिसांनी मृताची ओळख पटवली आणि अपघाताचे गूढ उकलले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मृत व्यक्तीच्या अंगावर पांढरा-खाकी पट्टेदार टी-शर्ट व निळी जीन्स होती. या कपड्यांचे वर्णन प्रसिद्ध करून नागरिकांना आवाहन करण्यात आले होते. त्याला प्रतिसाद मिळाल्यानंतर मृताची ओळख सलीम महमद युनूस उर्फ युसुफ शेख (वय ३४, रा. माऊली चौक, अलीपूर रोड, बार्शी) अशी पटली.
अपघाताचा घटनाक्रम
१ जून रोजी रात्री सलीम शेख हे उपळाई शिवारातून बार्शी-परंडा रस्त्याने पायी जात असताना परंडा तालुक्यातील खासगाव येथील महेश राजेंद्र लिमकर (वय २०) हा एमएच २५ एव्ही ८६७० क्रमांकाच्या दुचाकीवरून भरधाव वेगाने येत होता. निष्काळजीपणे वाहन चालवत असताना त्याने सलीम शेख यांना जोरदार धडक दिली. या भीषण अपघातात सलीम शेख यांचा जागीच मृत्यू झाला, तर महेश लिमकर हा देखील जखमी झाला.
सीसीटीव्हीच्या मदतीने आरोपीचा शोध
सुरुवातीला बार्शी तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली होती. मात्र, पोलिसांनी घटनास्थळ व परिसरातील सीसीटीव्ही फुटेजची बारकाईने तपासणी करून आरोपी व संबंधित वाहनाचा शोध लावला.
तपास अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक चंद्रकांत घोळवे यांनी सरकारी फिर्याद दाखल करून आरोपी महेश लिमकर याच्याविरुद्ध भारतीय न्याय संहिता (BNS) कलम २८१, १०६(१), १२५ (अ)(ब), ३२४(२) तसेच मोटार वाहन कायदा कलम १८४ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.
पोलिसांचे आवाहन
अपघातांच्या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी वाहनचालकांना वेगमर्यादा पाळण्याचे आवाहन केले आहे. निष्काळजी वाहनचालकांमुळे निष्पाप नागरिकांचे जीव जात असल्याचे नमूद करत, अपघाताची माहिती तात्काळ १०० क्रमांकावर देण्याचे आवाहनही करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *