जरांगे पाटील यांच्या पाठपुराव्याला यश; धाराशिवमधील मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या कुटुंबियांना प्रत्येकी १० लाखांची मदत

यशश्री अपडेट्स-धाराशिव | प्रतिनिधी
मराठा आरक्षणाच्या लढ्यात आत्महत्या केलेल्या अथवा मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत देण्याच्या मागणीला अखेर यश आले असून, मराठा आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यानंतर शासनाने धाराशिव जिल्ह्यातील पाच कुटुंबांना प्रत्येकी १० लाख रुपये आर्थिक सहाय्य मंजूर केले आहे.
मुख्यमंत्री सचिवालयातून ४ जून २०२६ रोजी जारी करण्यात आलेल्या पत्रानुसार, मराठा समाजास आरक्षण मिळावे यासाठी आंदोलनादरम्यान आत्महत्या केलेल्या अथवा मृत्यूमुखी पडलेल्या व्यक्तींच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून एकूण ५० लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.
मदत मंजूर झालेल्या धाराशिव जिल्ह्यातील लाभार्थ्यांमध्ये –
▪️ सूरज अरुण जगताप (डोकेवाडी, ता. भूम)
▪️ दिगंबर वसंतराव कांबळे (तुळजापूर)
▪️ मोहन अंबादास बेंडकाळे (मुरूम, ता. उमरगा)
▪️ परमेश्वर राजेंद्र जिल्हाळ (कोल्हेवाडी, धाराशिव)
▪️ प्रशांत गोविंदराव पवार (बावका, ता. परंडा)
या पाच कुटुंबांचा समावेश आहे.
शासनाने संबंधित जिल्हाधिकाऱ्यांना आवश्यक पडताळणी करून वारसांना ही मदत वितरित करण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच निधीचा योग्य विनियोग झाल्याबाबतचा अहवालही शासनाकडे सादर करण्यास सांगितले आहे.
मराठा आरक्षणासाठी बलिदान दिलेल्या कुटुंबांना न्याय मिळवून देण्यासाठी मनोज जरांगे पाटील यांनी सातत्याने पाठपुरावा केला होता. शासनाच्या या निर्णयामुळे संबंधित कुटुंबांना मोठा दिलासा मिळाला असून मराठा समाजातून समाधान व्यक्त केले जात आहे.

Leave a Reply

error: Content is protected !!