यशश्री अपडेट्स- परंडा(प्रतिनिधी )
परंडा शहरातील कुर्डुवाडी रोडवरील समता नगर परिसरात हॉस्पिटलच्या संरक्षक भिंतीच्या वादातून दोन गट आमनेसामने आल्याची घटना घडली असून, या प्रकरणामुळे शहरात मोठी खळबळ उडाली आहे. या वादाचे पर्यवसान थेट हाणामारीत झाले असून दोन्ही बाजूंनी परंडा पोलीस ठाण्यात परस्परविरोधी तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, प्रसिद्ध डॉक्टर आनंद मोरे यांनी माजी नगराध्यक्ष जाकीर सौदागर व वाहेद सौदागर यांच्याकडून मारहाण व सोन्याची साखळी हिसकावल्याचा आरोप केला आहे. तर दुसरीकडे, वाहेद सौदागर यांनी डॉक्टरांनी ब्लेडने वार करून एका महिलेशी गैरवर्तन केल्याचा गंभीर आरोप करत तक्रार दाखल केली आहे.
डॉक्टर मोरे यांचा आरोप
डॉ. आनंद मोरे यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या हॉस्पिटलशेजारील जागेत पार्किंग व लॉजिंग होणार असल्यामुळे रुग्णांच्या सुरक्षेच्या दृष्टीने त्यांनी स्वतःच्या जागेत संरक्षक भिंत बांधली होती. मात्र, ही भिंत तोडण्यात आल्याने वाद निर्माण झाला.
या प्रकरणी २२ मे रोजी सायंकाळी जाकीर सौदागर, वाहेद सौदागर व सुमारे ३० जणांच्या जमावाने हॉस्पिटलमध्ये घुसून शिवीगाळ केली व मारहाण केल्याचा आरोप डॉक्टरांनी केला आहे. यामध्ये डोक्यावर बुक्की मारून जखमी केल्याचे तसेच गळ्यातील सोन्याची चैन हिसकावल्याचेही त्यांनी म्हटले आहे. डॉक्टरांच्या पत्नीशीही अवाच्य भाषेत बोलल्याचा आरोप करण्यात आला आहे. जखमी डॉक्टरांवर बार्शी येथील रुग्णालयात उपचार सुरू असल्याचे सांगण्यात आले.
सौदागर गटाचा प्रतिवाद
वाहेद सौदागर यांनी डॉक्टरांचे सर्व आरोप फेटाळून लावत उलट डॉक्टरांनीच त्यांच्या जागेवर अतिक्रमण करून भिंत बांधल्याचा दावा केला आहे. याबाबत विचारणा करण्यासाठी गेल्यानंतर डॉक्टरांनी दमदाटी करत स्वतःच्या खिशातून सायकलचे ब्लेड काढून हल्ला केल्याचा आरोप त्यांनी केला.
या हल्ल्यात वाहेद सौदागर यांचा मुलगा उवेद याच्या पाठीवर ब्लेड लागल्याने गंभीर दुखापत झाल्याचे सांगण्यात आले. तसेच भांडण सोडवण्यासाठी आलेल्या एका महिलेशी गैरवर्तन केल्याचाही आरोप सौदागर गटाने केला आहे.
पोलिसांकडून तपास सुरू
या प्रकरणात दोन्ही बाजूंनी तक्रारी दाखल झाल्या असून परंडा पोलीस ठाण्याकडून पुढील तपास सुरू आहे. शहरातील दोन प्रतिष्ठित गटांमध्ये झालेल्या या वादामुळे नागरिकांमध्ये चर्चेला उधाण आले आहे.
