दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर व मागासवर्गीय समाजाला तातडीने आर्थिक मदत द्या; संजय कुमार बनसोडे यांची तहसीलदारांकडे मागणी!

कर्जमाफी, चारा छावण्या, पाणीपुरवठा आणि महिला बचत गटांना दिलासा देण्याची मागणी; केंद्र व राज्य शासनाकडे प्रस्ताव पाठवण्याचे निवेदन

यशश्री अपडेट्स | परंडा :

धाराशिव जिल्ह्यासह संपूर्ण मराठवाड्यात निर्माण झालेल्या दुष्काळी परिस्थितीमुळे शेतकरी, शेतमजूर आणि मागासवर्गीय समाजातील नागरिकांचे जनजीवन मोठ्या प्रमाणात विस्कळीत झाले आहे. शेतीतून अपेक्षित उत्पन्न मिळत नसल्याने ग्रामीण भागातील अनेक कुटुंबांसमोर आर्थिक संकट उभे राहिले असून, काही कुटुंबांवर उदरनिर्वाहाचा प्रश्न निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आणि मागासवर्गीय समाजाला शासनाने तातडीने विशेष आर्थिक मदत द्यावी, अशी जोरदार मागणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) चे महाराष्ट्र प्रदेश चिटणीस संजय कुमार बनसोडे यांनी केली आहे.

यासंदर्भात त्यांनी परंडा तहसीलदारांची भेट घेऊन विविध मागण्यांचे निवेदन सादर केले. दुष्काळाच्या झळा सर्वसामान्य नागरिकांना सहन कराव्या लागत असून, विशेषतः आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांची परिस्थिती अधिक गंभीर बनली आहे. त्यामुळे केंद्र आणि राज्य शासनाने परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन विशेष आर्थिक मदतीचे पॅकेज जाहीर करावे, अशी मागणी त्यांनी निवेदनातून केली.

पीककर्जासह महामंडळांची कर्जे माफ करा

दुष्काळामुळे आर्थिक अडचणीत सापडलेल्या मागासवर्गीय शेतकरी व शेतमजुरांचे पीककर्ज तसेच पात्र कृषी कर्ज पूर्णपणे माफ करण्यात यावे. महात्मा फुले मागासवर्गीय विकास महामंडळ आणि इतर शासकीय महामंडळांकडून कर्ज घेतलेल्या लाभार्थ्यांनाही कर्जमाफीचा लाभ द्यावा. तसेच जुन्या कर्जाचा बोजा कमी करून पात्र लाभार्थ्यांना नव्याने कर्ज उपलब्ध करून द्यावे, अशी मागणी करण्यात आली आहे.

जनावरांसाठी चारा छावण्या आणि पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करा

दुष्काळी परिस्थितीमुळे ग्रामीण भागात पशुधनाच्या चारा आणि पाण्याचा प्रश्न गंभीर होत आहे. त्यामुळे मागासवर्गीय कुटुंबांकडे असलेल्या जनावरांसाठी चारा छावण्या सुरू कराव्यात, पुरेसा चारा उपलब्ध करून द्यावा आणि पशुधन संरक्षणासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी निवेदनात करण्यात आली आहे.

तसेच प्रत्येक गावातील दलित वस्त्यांमध्ये बोअरवेल पाडून पिण्याच्या पाण्याची कायमस्वरूपी व्यवस्था करावी. ज्या ठिकाणी बोअरवेलद्वारे पाणी उपलब्ध होणे शक्य नाही, अशा ठिकाणी टँकरद्वारे नियमित पाणीपुरवठा करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.

महिला बचत गटांना कर्जमाफी; फायनान्स कंपन्यांची वसुली थांबवा

दुष्काळामुळे ग्रामीण भागातील महिलांच्या आर्थिक व्यवहारांवरही परिणाम झाला आहे. महिला बचत गटांच्या कर्जदारांना कर्जमाफी देऊन आर्थिक दिलासा द्यावा. तसेच दलित वस्त्यांमधील महिलांनी खासगी फायनान्स कंपन्यांकडून घेतलेल्या कर्जाची वसुली तात्काळ थांबविण्यासाठी शासनाने योग्य हस्तक्षेप करावा, अशी मागणी संजय कुमार बनसोडे यांनी केली आहे.

स्वाधार योजनेचा लाभ तातडीने द्या

मागासवर्गीय कुटुंबांतील पात्र लाभार्थ्यांना स्वाधार योजनेचा लाभ प्राधान्याने उपलब्ध करून द्यावा. शासकीय योजनांचा लाभ मिळण्यात येणाऱ्या अडचणी दूर करून पात्र नागरिकांना वेळेत मदत मिळावी, अशी अपेक्षाही निवेदनातून व्यक्त करण्यात आली आहे.

या सर्व मागण्यांची शासनाने गांभीर्याने दखल घ्यावी. संबंधित केंद्रीय मंत्रालय आणि महाराष्ट्र शासनाकडे आवश्यक प्रस्ताव पाठवून दुष्काळग्रस्त शेतकरी, शेतमजूर आणि मागासवर्गीय समाजाला तातडीने आर्थिक दिलासा मिळवून द्यावा, अशी विनंती संजय कुमार बनसोडे यांनी तहसीलदारांकडे केली.

या निवेदनाच्या प्रती मुख्यमंत्री, महसूल मंत्री, पालकमंत्री, जिल्हाधिकारी धाराशिव तसेच परंडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ. तानाजी सावंत यांनाही सादर करण्यात आल्या.

यावेळी हे पदाधिकारी होते उपस्थित

निवेदन सादर करताना रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचे ज्येष्ठ नेते फकीर दादा सुरवसे, तालुकाध्यक्ष दादासाहेब सरवदे, सोशल मीडिया आयटी सेलचे जिल्हाध्यक्ष आकाश बनसोडे, तालुका उपाध्यक्ष जयराम साळवे, ज्येष्ठ नेते संजीवन भोसले, बाबा गायकवाड, भारत धेंडे, फुलचंद ओव्हाळ, बापू हावळे, हरिभाऊ आढाळे, भास्कर ओव्हाळ, संजय यशवद, रामा दाभाडे, आजिनाथ कांबळे, हनुमंत हावळे, बापू लोंढे, उत्तम ओहाळ यांच्यासह रिपाईचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

error: Content is protected !!