धाराशिव | यशश्री अपडेट्स (प्रतिनिधी):
“खासदार ओमराजे निंबाळकर हे गद्दार, डरपोक, भामटे आणि सोंगाडे आहेत. ते तब्बल १०० कोटी रुपयांना विकले गेले आहेत,” असा खळबळजनक आणि घणाघाती आरोप शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे. धाराशिव येथे आयोजित करण्यात आलेल्या एका जाहीर सभेत बोलताना राऊत यांनी ओमराजेंवर भ्रष्टाचाराचे गंभीर आरोप करत त्यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला.
पवनराजे निंबाळकर यांच्या हत्येमागे काहीतरी वेगळेच रहस्य असल्याचा संशय व्यक्त करत, “आम्ही गेली १५-२० वर्षे एका सापाला दूध पाजले, आता त्याची नांगी ठेचण्याची वेळ आली आहे,” अशा तीव्र शब्दांत त्यांनी ओमराजेंचा समाचार घेतला.
ईडीच्या चौकशीला घाबरून शिंदे गटात पळाले
खासदार संजय राऊत यांनी ओमराजे यांच्या पक्षांतरामागील कथित कारणांचा पर्दाफाश केला. ते म्हणाले, “ओमराजे हे अत्यंत भ्रष्टाचारी आहेत. ‘पवनराजे मल्टीस्टेट’च्या माध्यमातून त्यांनी तब्बल ५०० कोटी रुपयांची मालमत्ता आणि जमिनी खरेदी केल्या आहेत. या संस्थेच्या बँकेत सामान्य नागरिकांच्या नावावर बनावट खाती उघडून मोठा आर्थिक गैरव्यवहार करण्यात आला. या सर्व घोटाळ्यांमुळे त्यांच्या मागे ‘ईडी’ची (सक्तवसुली संचालनालय) चौकशी लागली होती. याच ईडीच्या चौकशीला घाबरून हा डरपोक माणूस शिंदे गटात पळाला.” याशिवाय, तेरणा कारखान्याचे भंगार विकूनही पैसे खाल्ल्याचा आरोप राऊत यांनी केला.
‘शिवसैनिकांनी रक्ताचे पाणी केले, तू स्वतःच्या ताकदीवर मोठा झाला नाहीस’
ओमराजेंच्या भूतकाळाची आठवण करून देत राऊत म्हणाले, “तू साधा ग्रामपंचायत सदस्यही नव्हतास, अशा वेळी पक्षाने तुला आमदार आणि खासदार केले. तेव्हा तू म्हणाला होतास की मी कधीच पक्षाची साथ सोडणार नाही. मग आता काय केलेस रे भामट्या? तू स्वतःच्या ताकदीवर खासदार झालेला नाहीस. तुला निवडून आणण्यासाठी हजारो शिवसैनिकांनी दिवस-रात्र कष्ट केले, रक्ताचे पाणी केले आणि अनेकांनी त्याग केला आहे. उमाच्या १०० शिवसैनिकांनी तर स्वतःच्या किडन्या विकून पक्षनिधी देण्याची तयारी दर्शवली होती. अशा निष्ठावंतांशी तू गद्दारी केलीस.”
“समाधान पाटील यांची हत्या शिंदे यांच्या लोकांनी केली आणि हाच खासदार आज जाऊन त्यांच्याच मांडीवर बसला आहे. पक्षाशी गद्दारी करताना तू तुझ्या आत्म्याला एकदातरी विचारले होतेस का?”
— खासदार संजय राऊत‘धाराशिवची काय दुबई किंवा सिंगापूर केली का?’
ओमराजे निंबाळकर यांच्या ‘विकासासाठी सत्ताधाऱ्यांसोबत गेलो’ या दाव्याचा राऊत यांनी चांगलाच समाचार घेतला. “हा सोंगाड्या म्हणतो की मी जिल्ह्याच्या विकासासाठी गेलो; पण मला सांगा, यांनी धाराशिवचा काय विकास केला? धाराशिवची काय दुबई किंवा सिंगापूर केली का? हा केवळ स्वतःच्या बँकांमध्ये पैसे जमा करण्यासाठी आणि स्वतःचा विकास करण्यासाठी तिथे गेला आहे. अशा सोंगाड्याला आता धाराशिवच्या रस्त्यांवर उतरू देऊ नका,” असे आवाहन राऊत यांनी जनतेला केले.
या सभेतील संजय राऊत यांच्या झंझावाती भाषणामुळे धाराशिवच्या राजकीय वर्तुळात प्रचंड खळबळ उडाली असून, आगामी काळात येथील राजकीय संघर्ष अधिक तीव्र होण्याची चिन्हे दिसत आहेत.

