‘संपत्तीची रास आणि खोक्यांचं आमिष लाथाडणारा कैलास हाच खरा शिवसैनिक’; धाराशिवमध्ये उद्धव ठाकरेंकडून आमदार कैलास पाटलांचे कौतुक

यशश्री अपडेट्स:धाराशिव, २८ जून:
२०२२ मध्ये जेव्हा गद्दारी झाली, तेव्हा कैलासच्याही पायाशी संपत्तीची रास पडली होती. खोक्यांचे मोठे आमिष होते. मात्र, त्या सगळ्‍यावर लाथ मारून त्याने शिवसेनेशी आपले इमान राखले. शिवसैनिक कसा असावा, हेच कैलासने आपल्या कृतीतून दाखवून दिले,” अशा शब्दांत शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी आमदार कैलास पाटील यांच्या निष्ठेचा गौरव केला. धाराशिव येथे आयोजित सभेत ते बोलत होते.

सुरतच्या बॉर्डरवरून मारली होती उडी…

त्या ऐतिहासिक बंडाच्या वेळची आठवण करून देताना उद्धव ठाकरे म्हणाले, “२०२२ मधील गद्दारीच्या वेळी आमदारांना गाड्यांमधून पळवून नेले जात होते. त्यावेळी कैलासने मला फोन करून या सर्व घडामोडींची माहिती दिली होती. तो गद्दार आमदारांच्या तावडीतून सुटण्यासाठी सुरतच्या बॉर्डरवर चालत्या गाडीतून उडी टाकून पायी चालत परत आला. मी स्वतः मुख्यमंत्री असताना नंतर त्याला सुरक्षित आणण्याची व्यवस्था केली होती. कैलाससमोर सर्व प्रलोभने होती, पण त्याने निष्ठा निवडली. हाच खरा शिवसैनिक आहे.”
यावेळी खासदार संजय राऊत यांनीही आमदार कैलास पाटील यांच्या पक्षाप्रती असलेल्या निष्ठेबद्दल समाधान व्यक्त केले आणि त्यांचे कौतुक केले.

‘निष्ठा ही बोलून नाही, कृतीतून दाखवायची असते’ – कैलास पाटील

उद्धव ठाकरेंच्या कौतुकाला उत्तर देताना आमदार कैलास पाटील भावुक झाले होते. ते म्हणाले, “निष्ठा ही केवळ बोलून दाखवण्याची गोष्ट नाही, तर ती संकटाच्या काळात कृतीतून सिद्ध करावी लागते. मी उद्धव साहेबांची साथ कधीही सोडणार नाही.”
तसेच उपस्थित शिवसैनिकांना शब्द देताना ते पुढे म्हणाले, “माझ्यावर कितीही कठीण वेळ आली, तरी मी माझ्या शिवसैनिकांना कधीही वाऱ्यावर सोडणार नाही. आपण एकत्र मिळून पक्षाची ताकद अधिक मजबूत करू.”

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *