परंड्यात निर्भयतेला तडा; तरुणीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणी तिघांवर गुन्हा

परंडा तालुक्यात धक्कादायक प्रकार; २४ वर्षीय तरुणीवर तिघांकडून लैंगिक अत्याचार, गुन्हा दाखल

यशश्री अपडेट्स | परंडा प्रतिनिधी

परंडा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील एका गावात २४ वर्षीय तरुणीवर तिघा तरुणांनी वेगवेगळ्या वेळी लैंगिक अत्याचार केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. पीडित तरुणीने दिलेल्या फिर्यादीवरून परंडा पोलिसांनी तिघांविरुद्ध भारतीय न्याय संहितेतील (BNS) विविध गंभीर कलमांखाली तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, २५ मे २०२६ रोजी दुपारी सुमारे ३ वाजण्याच्या सुमारास गावातील एका तरुणाने मोबाईल चार्जिंगला लावण्याचे कारण सांगून पीडितेला मँगो ज्यूस दिला. हा ज्यूस पिल्यानंतर तिला गुंगी आल्याचा फायदा घेत आरोपीने तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप फिर्यादीत करण्यात आला आहे. तसेच या घटनेचे छायाचित्रण करून, ही बाब कोणाला सांगितल्यास फोटो व व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करण्याची धमकी दिल्याचेही तक्रारीत नमूद करण्यात आले आहे.

यानंतर गावातील दुसऱ्या एका तरुणाने पीडितेच्या घरी जाऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. तर ३ जून २०२६ रोजी दुपारी सुमारे ४ वाजण्याच्या सुमारास तिसऱ्या आरोपीने पीडितेला आपल्या घरी नेऊन तिच्यावर अत्याचार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

पीडितेने ५ जून २०२६ रोजी दिलेल्या प्रथम खबरेवरून परंडा पोलीस ठाण्यात भारतीय न्याय संहिता (BNS) कलम ६४(१), ६४(२), ७७, १२३, ३३३, ३५१(२) तसेच अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायद्यातील कलम ३(२)(व्हीए) अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस प्रशासनाकडून सुरू असून आरोपींची नावे अद्याप जाहीर करण्यात आलेली नाहीत. तसेच कायद्यानुसार पीडितेची ओळख गोपनीय ठेवण्यात आली आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *