यशश्री अपडेट्स-धाराशिव (प्रतिनिधी) :
प्रशासन आणि नागरिक यांच्यातील दरी कमी करून शासनाच्या योजना तळागाळापर्यंत प्रभावीपणे पोहोचाव्यात, या उद्देशाने जिल्हाधिकारी कीर्ती कुमार पुजार यांनी तुळजापूर तालुक्यातील तीर्थ बुद्रुक येथे मुक्कामी दौरा केला. या दौऱ्यात त्यांनी ग्रामस्थांशी थेट संवाद साधून त्यांच्या समस्या, अडचणी आणि विकासाच्या अपेक्षा जाणून घेतल्या.
दि. ५ जून रोजी झालेल्या या दौऱ्यात तहसीलदार, गटविकास अधिकारी तसेच तालुका प्रशासनातील विविध विभागांचे अधिकारी आणि कर्मचारी सहभागी झाले होते. गावात मुक्कामी राहून जिल्हाधिकाऱ्यांनी केवळ औपचारिक पाहणी न करता ग्रामस्थांशी प्रत्यक्ष संवाद साधला. वैयक्तिक लाभाच्या शासकीय योजनांच्या अंमलबजावणीत येणाऱ्या अडचणी, पायाभूत सुविधांची गरज तसेच गावाच्या सर्वांगीण विकासासंबंधी विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली.
या संवादातून ग्रामस्थांच्या सहभागाने अधिक परिणामकारक आणि वास्तवदर्शी विकास आराखडा तयार करण्यासाठी दिशा निश्चित करण्यात आली. गावाच्या गरजा आणि स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन विकास प्रक्रियेला गती देण्यावर भर देण्यात आला.
दौऱ्याच्या दुसऱ्या दिवशी सकाळी ७ ते ८.३० या वेळेत जिल्हाधिकाऱ्यांच्या उपस्थितीत स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांनी एकत्रितपणे गाव परिसर स्वच्छ करून स्वच्छतेचा संदेश दिला. त्यानंतर शिवार फेरी काढून शेती व ग्रामीण भागातील विविध बाबींचा आढावा घेण्यात आला.

यावेळी “एक पेड माँ के नाम” या उपक्रमांतर्गत वृक्षारोपण करण्यात आले. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणाऱ्या या उपक्रमाला ग्रामस्थांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला. यामुळे पर्यावरणाबाबत जनजागृती होण्यास मदत झाली.
जिल्हाधिकाऱ्यांचा हा मुक्कामी दौरा केवळ प्रशासकीय पाहणीपुरता मर्यादित न राहता प्रशासन थेट जनतेच्या दारात पोहोचल्याचा अनुभव देणारा ठरला. ग्रामस्थांशी झालेल्या थेट संवादामुळे प्रशासनावरील विश्वास अधिक दृढ झाल्याच्या भावना गावकऱ्यांनी व्यक्त केल्या.

