धाराशिव | विशेष प्रतिनिधी
माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे आज धाराशिव दौऱ्यावर असून, त्यांच्या जाहीर सभेकडे आता संपूर्ण महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे. काही आठवड्यापूर्वी धाराशिवचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर (ओमराजे) यांनी केलेल्या पक्षांतरानंतर ठाकरे यांची धाराशिव जिल्ह्यातील ही पहिलीच जाहीर सभा आहे. त्यामुळे ठाकरे आपल्या या पूर्वीच्या अत्यंत विश्वासू शिलेदारावर आणि निष्ठा बदलणाऱ्यांवर काय बोलणार, याची कमालीची उत्सुकता राजकीय वर्तुळात निर्माण झाली आहे.
दुपारी ४ वाजता ‘सिध्दाई’मध्ये रणशिंग फुकणार
आज दुपारी ठीक ४ वाजता धाराशिव शहरातील प्रसिद्ध ‘सिध्दाई मंगल कार्यालय’ येथे या भव्य सभेचे आयोजन करण्यात आले आहे. लोकसभा निवडणुका आणि त्यानंतर झालेल्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर उद्धव ठाकरे धाराशिवकरांशी संवाद साधणार आहेत. ओमराजेंच्या या बालेकिल्ल्यात ठाकरे नेमकं काय बोलणार आणि आगामी निवडणुकांच्या दृष्टीने पक्षाची काय रणनीती असणार, याकडे सर्वांचे डोळे लागले आहेत.
धाराशिव शहरात जोरदार तयारी, कार्यकर्त्यांमध्ये प्रचंड उत्साह
उद्धव ठाकरे यांच्या स्वागतासाठी आणि सभेसाठी संपूर्ण धाराशिव शहरात जोरदार तयारी करण्यात आली आहे. शहराच्या प्रमुख चौकांमध्ये आणि रस्त्यांवर भगवे झेंडे, बॅनर्स आणि स्वागताचे होर्डिंग्स लावण्यात आले आहेत. पक्षांतरानंतर स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये मरगळ येऊ नये म्हणून या सभेच्या माध्यमातून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्याची तयारी स्थानिक ठाकरे गटाच्या नेत्यांनी केली आहे. जिल्ह्यातील कानाकोपऱ्यातून शिवसैनिक या सभेसाठी धाराशिव शहरात दाखल होत आहेत.
राज्याचं लक्ष लागण्यामागची कारणं:
- पक्षांतरानंतरची पहिलीच सभा: ओमराजेंनी पक्ष बदलल्यानंतर उद्धव ठाकरे थेट त्यांच्याच मतदारसंघात येत असल्याने या सभेला विशेष महत्त्व आले आहे.
- आक्रमक तोफ धडकणार: गद्दारी आणि पक्षांतराच्या मुद्द्यावरून उद्धव ठाकरे धाराशिवच्या जनतेसमोर कोणती भूमिका मांडतात, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.
- जिल्ह्यातील राजकीय समीकरणे: या सभेमुळे धाराशिव जिल्ह्यातील आगामी ग्रामपंचायत,विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थां यामध्ये राजकीय गणित बदलण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
