मंत्रीपद दिले तरी घेणार नाही; कुटुंबावर बोलू नये, कामातून टीकेला उत्तर देणार: खासदार ओमराजे निंबाळकर

यशश्री अपडेट्स: धाराशिव (प्रतिनिधी)
खासदार ओमराजे निंबाळकर यांना केंद्रात मंत्रीपद दिले जाणार असल्याची जोरदार चर्चा सुरू असतानाच, त्यांनी यावर एक मोठा खुलासा केला आहे. “मी कोणत्याही मंत्रीपदासाठी किंवा सत्तेसाठी पक्ष बदललेला नाही. मला जरी केंद्रात मंत्रीपद दिले, तरी मी ते घेणार नाही. माझ्या या निर्णयाचे कारण येणारा काळच स्पष्ट करेल,” अशी ठाम भूमिका खासदार ओमराजे यांनी मांडली आहे.
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षातून शिवसेना (शिंदे गट) पक्षात प्रवेश केल्यानंतर ओमराजे निंबाळकर हे प्रथमच धाराशिव येथे आले होते. त्यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना त्यांनी आपली राजकीय भूमिका आणि पक्षांतरामागील कारणे स्पष्ट केली.

शिवसैनिकांची नाराजी कामातून दूर करणार

ओमराजे पुढे म्हणाले, “माझ्या निर्णयामुळे शिवसैनिकांमध्ये असलेली नाराजी मला १०० टक्के मान्य आहे. पण ही नाराजी मी येत्या काळात माझ्या कामातून नक्कीच दूर करेन. पक्षात माझी मोठी कुचंबणा होत असल्यामुळेच मला हा निर्णय घ्यावा लागला.”
आपल्या विकासकामांचा दाखला देत ते म्हणाले, “धाराशिव शहरातील उद्यान आणि आठवडी बाजारासाठीच्या १८ कोटी रुपयांच्या कामाला स्थगिती देण्यात आली होती, मात्र आम्ही सत्तेत जाताच हा निधी मंजूर झाला आहे. मी टीकेचे विष सहन करायला तयार आहे. आगामी काळात कृष्णा मराठवाडा सिंचन प्रकल्प, नवनवीन उद्योग, तेरणा व मांजरा नदीवरील बॅरेज, सबस्टेशन, शेतकऱ्यांना वीज आणि फिडरची कामे प्रत्यक्ष जमिनीवर आणून दाखवणार आहे.”

‘ठाकरेंनी माझ्या कुटुंबाला राजकारणात ओढू नये’

उद्धव ठाकरे यांच्याशी असलेल्या संबंधांवर बोलताना ओमराजे भावूक झाले. “उद्धव ठाकरे जरी माझ्या विरोधात मतदारसंघात येऊन सभा घेत असले, तरी मी त्यांच्या विरोधात कधीही एक शब्दही बोलणार नाही. ठाकरे आणि माझे नाते भावनिक आहे. त्यांनी माझ्यावर वाटेल ती टीका करावी, पण माझ्या कुटुंबाला राजकारणात ओढू नये, एवढीच माझी अपेक्षा आहे. मी ज्या कारणासाठी पक्ष सोडला, त्याचे उत्तर वेळच देईल,” असे त्यांनी स्पष्ट केले.

विरोधकांच्या नीच प्रवृत्तीला विरोध, भूमिका बदलणार नाही

आपले राजकीय विरोधक आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्यावर नाव न घेता निशाणा साधताना ओमराजे म्हणाले, “ते अत्यंत नीच वृत्तीचे आहेत, त्यामुळे त्यांच्याशी एकमत होणे कधीही शक्य नाही. मी माझी मूळ भूमिका बदललेली नाही आणि या जन्मात तरी ती बदलणे शक्य नाही. माझा विरोध कोणत्याही पक्षाला नसून, या विशिष्ट प्रवृत्तीला आहे.”
केंद्रात मंत्रीपद घेणार नाही, असे ओमराजे जाहीरपणे सांगत असले तरी राजकीय वर्तुळात मात्र त्यांच्या नावाची चर्चा कायम आहे. आगामी काळात धाराशिवच्या राजकारणात अनेक मोठे बदल होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *